मुंबईकरांनो खबरदारी घ्या, धारावीत सापडला ओमीक्रॉनबाधित पहिला रूग्ण!

0
163
संग्रहित छायाचित्र.

मुंबई/नवी दिल्लीः मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख असलेल्या धारावी परिसरात ओमीक्रॉन विषाणूची बाधा झालेला रूग्ण सापडला आहे. विशेष म्हणजे या रूग्णाने कोरोनाची लस घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी ही व्यक्ती टांझानियाहून भारतात आली होती. त्यानंतर आता त्याला ओमीक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या त्याच्यावर अंधेरीच्या सेव्हन हिल्स रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.

धारावी परिसर प्रचंड दाटीवाटीचा असल्यामुळे या भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावण्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका या भागात विशेष काळजी घेत असतानाच धारावीत ओमीक्रॉनची बाधा झालेला रूग्ण सापडला आहे. या रूग्णाच्या संपर्कात दोन जण आले होते. त्यांचाही माग काढण्यात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. धारावीत सापडलेल्या या रूग्णामुळे महाराष्ट्रातील ओमीक्रॉनबाधित रूग्णांची संख्या आता ११ वर गेली आहे.

चला उद्योजक बनाः एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

देशातील रूग्णसंख्या २६ वरः भारतातील ओमीक्रॉनबाधित रूग्णांची संख्या आता २६ वर गेली आहे. त्यात महाराष्ट्रातील १ आणि राजस्थानातील ९ अशा १० जणांनी ओमीक्रॉनवर मात केली आहे. त्यांना रूग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांत भारतात ओमीक्रॉनचा एकही रूग्ण आढळला नव्हता. ओमीक्रॉनबाधितांची रूग्णसंख्या २३ वरच स्थिरावली होती. मात्र आज गुजरातच्या जामनगरमध्ये २ आणि महाराष्ट्रातील धारावीत एक असे तीन नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

१६ दिवसांत ५९ देशांत शिरकावः २४ नोव्हेंबर रोजी सर्व प्रथम दोन देशांत ओमीक्रॉनचे रूग्ण आढळले होते. त्यानंतर गेल्या १६ दिवसांत ५९ देशांत ओमीक्रॉनने शिरकाव केला असून एकूण ओमीक्रॉनबाधितांची संख्या २ हजार ९३६ वर गेली आहे. शिवाय विविध देशांत ओमीक्रॉन सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ७८ हजार ५४ वर गेली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा