‘भल्या पहाटेच्या शपथविधी’ची वर्षपूर्तीः वर्ष उलटले तरी भाजपचे सत्तेचे स्वप्नरंजन संपेना!

0
138
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे राजभवनात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या आणि फडणवीसांचे सरकार अवघ्या ८० तासांत कोसळल्याच्या घटनेला आज बरोबर एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार पडण्याचे मुहूर्त भाजपने अनेकदा सांगितले. मात्र तसे काहीच घडताना दिसत नसूनही पुन्हा सत्तेत येण्याच्या स्वप्नरंजनातून बाहेर पडायला फडणवीस आणि त्यांची भाजप तयार नाही.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अत्यंत महत्वाची घडामोड म्हणून पाहिल्या गेलेल्या २३ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या भल्या पहाटेच्या शपथविधीने राजकीय सारीपाटाच्या खेळात देवेंद्र फडणवीस ‘अजाणते आणि अपरिपक्व खेळाडू’ असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय चक्रव्यूहात अलगद अडकले आणि भल्या पहाटेचे मुख्यमंत्री बनले होते.

महाविकास आघाडी सरकारमधील विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी कसे काय गेले, या प्रश्नाचे उत्तर राजकीय विश्लेषक आणि नेतेही शोधत आहेत. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित आमदारांना सांगावा धाडून मुंबईत बोलावण्यात आले होते. ते मुंबईत पोहोचले आणि काय घडत आहे हे कळण्याच्या आधीच २३ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे त्यापैकी अनेक जण भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहून अवाक झाले होते. सायंकाळपर्यंत त्या सर्वच्या सर्व आमदारांनी भल्या पहाटेच्या सरकारपासून स्वतःला वेगळे केले आणि अवघ्या ८० तासांतच फडणवीसांचे सरकार कोसळले. हे घडवले नसते तर महाविकास आघाडीचा सत्तेत येण्याचा मार्ग खडतर झाला असता. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एवढ्या सहजासहजी महाविकास आघाडीला सरकार स्थापनेचे निमंत्रण द्यायला तयारच झाले नसते, असे आता राजकीय विश्लेषक सांगू लागले आहेत.

औटघटकेचे फडणवीस सरकार कोसळल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. तीन पक्षांचे हे सरकार फारकाळ टिकणार नाही, हे सरकार अंतर्विरोधातूनच पडेल, अशी भविष्यवाणी त्यानंतर देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या जवळपास सर्वच नेत्यांकडून वारंवार होत राहिली. ती आताही होतच आहे. काही नेत्यांनी तर सरकार कोसळण्याचे पक्के मुहूर्तही सांगून टाकले होते. तरी सरकार कोसळले नाही. भिन्न विचारसरणीचे तीन पक्ष या सरकारमध्ये असूनही त्यांच्यामध्ये सरकार कोसळेल असे मतभेद झाल्याचे वर्षभरात कधीच दिसले नाही. तरीही हे सरकार कोसळणारच हा भाजपचा आशावाद अजूनही सुटलेला नाही.

सध्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका सुरु आहेत. या निवडणुकीच्या प्रचारातही भाजप नेतेही प्रवीण दरेकर यांनी या निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय हालचाली होतील आणि हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी केली आहे.

एकीकडे वर्षानुवर्षे सत्तेच्या राजकारणाचा अनुभव असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी सरकारमध्ये आहेत. दुसरीकडे अवघी पाच वर्षे सत्तेचा अनुभव असलेले आणि त्याही पाच वर्षात विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडायला जवळपास अडीच वर्षे लावलेले फडणवीस आणि त्यांचे नेते आहेत. सरकार टिकवणे आणि पाडणे अशा दोन स्पर्धांत सध्या तरी महाविकास आघाडीची सरशी होताना आणि भाजपची नाचक्की होताना दिसते आहे. ती आणखी किती होते, हे पुढचा काळच सांगणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा