महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरील कार्यक्रम ऑनलाइन, घरूनच करा बाबासाहेबांना वंदन!

0
91
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या भावना समजून शासकीय मानवंदना आणि हॅलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल, त्यामुळे गावपातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत प्रत्येक अनुयायाला ऑनलाइन स्वरूपात अभिवादन कार्यक्रम पाहता येईल. या कार्यक्रमाचे विविध समाजमाध्यमांद्वारे ऑनलाइन प्रसारणही करण्यात येईल, यासाठी शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाच्या वतीने करावयाच्या सेवा-सुविधांबाबत तसेच मार्गदर्शक सूचना जारी करण्यासंदर्भात आज विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंडे यांनी ही माहिती दिली.

महापरिनिर्वाणदिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशातून तसेच जगभरातून अनुयायी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर दरवर्षी अभिवादनासाठी उपस्थित राहतात. यावर्षी कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून केवळ शासकीय मानवंदना देण्याच्या समन्वय समितीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात यावा. यासंदर्भात शक्य तितक्या लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शासन निर्णय जाहीर व्हावा. त्यामुळे सर्वांना पूर्वसूचना प्राप्त होईल. शासकीय अभिवादन सोहळा, हॅलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि सर्व समाजमाध्यमांतून ऑनलाइन प्रक्षेपण करण्यासंदर्भात शासन आणि महानगरपालिका स्तरावर उचित निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशी सूचना पटोले यांनी केली. त्यावर मुंडे यांनी ही माहिती दिली.

 ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या धर्तीवर ‘माझी चैत्यभूमी, माझी जबाबदारी’ अशा आशयाच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन पटोले, मंत्री धनंजय मुंडे, खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी महानगरपालिका व शासनामार्फत अनुयायांसाठी योग्य व्यवस्थापन करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाचा संसंर्ग पसरू नये यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदा मोठ्या संख्येने अनुयायी येऊन त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि राज्य शासन यांच्यामार्फत योग्य उपाययोजना आखण्यात याव्यात, अशा सूचना पटोले यांनी केल्या.

समन्वय समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या गर्दी टाळण्याच्या जागरूकतेच्या भूमिकेचे शासन स्तरावर स्वागत केले. शासन आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून अभिवादन कार्यक्रम अतिशय सुयोग्य प्रकारे आयोजित केला जाईल. अनुयायांना चैत्यभूमीला येणे शक्य नसल्याने हा कार्यक्रम सर्व अनुयायांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. या अभिवादन कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेऊन त्वरित शासकीय परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याचेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीस खासदार राहुल शेवाळे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, बेस्टचे सुरेंद्र बागडे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल, प्रधान सचिव विनित अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सह पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, मयुर कांबळे, सदानंद मोहिते, चंद्रशेखर कांबळे, सुबोध भारत आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा