आकरावीचे निशुल्क ऑनलाइन वर्ग सुरु होणार, इच्छूक विद्यार्थ्यांची नोंदणी सुरु

0
98
संग्रहित छायाचित्र.

पुणेः  मराठा आरक्षणामुळे ११ वीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी निशुल्क ऑनलाइन वर्ग लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. हे ऑनलाइन वर्ग निशुल्क असून त्यासाठी नोंदणीही सुरु झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे राज्यात सुरु असलेली आकरावीची प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने सरन्यायाधीशांकडे अर्ज करून लवकर घटनापीठ स्थापन करुन मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. परंतु या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद आहेत. त्यातच मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आकरावीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

आकरावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) माध्यमातून महाराष्ट्र सरकारने आकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी हे ऑनलाइन वर्ग यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चालणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. हे वर्ग/ तासिका निशुल्क आहेत. इच्छूक विद्यार्थ्यांनी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh लिंकवर जाऊन नोंदणी करावी,असे आवाहन एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा