कोरोना लसीकरणात फ्रंटलाइन वर्कर्सच मागे, अवघ्या ७.५७ टक्के जणांनी घेतली लस

0
68
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई:  राज्यात कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून या लसीकरणात फ्रंटलाइन वर्कर्सच मागे असल्याची माहिती हाती आली आहे. आतापर्यंत केवळ ७.५७ टक्केच फ्रंटलाइन वर्कर्सनी लसीकरण करून घेतले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीकरणासाठी ५ लाख ४७ हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी कोविन अॅपवर झाली असून त्यापैकी ४१ हजार ४५३ जणांना लस  देण्यात आली आहे. लसीकरणाचे हे प्रमाण अवघे ७.५७ टक्के आहे. तर आतापर्यंत कोविन पोर्टलवर १० लाख ५४ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४ लाख ६८ हजार २९३ आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे हे प्रमाण ४४.४ टक्के आहे.

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोना लसीकरण सुरु असून ६५२ केंद्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया केली जात आहे. आतापर्यंत एकूण ५ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जाणार असून त्याची नोंदणी साधारणपणे १ मार्चपासून होऊ शकते, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे लसीकरण सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात दररोज साधारणपणे ४० ते ४५ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील व ज्यांना सहव्याधी आहे अशा ५० वर्षाखालील व्यक्तींना लसीकरण करणार असून त्यासंदर्भात केंद्र शासनकडून सूचना मिळाल्या नाहीत. साधारणपणे १मार्चच्या सुमारास त्यांची नोंदणी सुरु होण्याची शक्यता असून त्यानंतर लसीकरण केले जाईल असेही टोपे यांनी सांगितले.

राज्यात लसीकरणादरम्यान कुठेही गंभीर दुष्परिणामाच्या घटनांची नोंद झाली नाही. लसीकरण सुरु असले तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक असून मास्कचा वापर, हात धुणे आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन टोपे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा