राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु होणार, रविवारी कोल्हापुरात ‘सारथी’चे उपकेंद्र

0
77
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: महाराष्ट्राचे पोलीस दल हे देशातील सर्वोत्तम पोलीस दल असून ते जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरण्यासाठी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यात यावी, त्या माध्यमातून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे असे आवाहन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात विभागवार पोलीस प्रशिक्षण केंद्रे सुरु करावीत अशी सूचना आज केली. येत्या रविवारी राजर्षि शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने कोल्हापूर येथे सारथीचे उपकेंद्र सुरु करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

साताऱ्याच्या मल्हारपेठ पोलीस ठाणे व पोलीस वसाहत इमारतीच्या ई भूमिपूजन कार्यक्रमाच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री(ग्रामीण) शंभुराज देसाई,  गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे पोलीस गृहनिर्माण विभागाचे पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‍ विनय गौडा, सातारा पोलीस दलातील अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पोलिसांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे सरकारः नागरिकांच्या घराचे आणि जीवाचे रक्षण पोलीस करतात पण त्यांच्याच घरांचे संरक्षण होणार नसेल तर त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणे अत्यंत स्वाभाविक आहे, हे दुष्परिणाम टाळण्यासाठी उत्तम दर्जाच्या आणि आधुनिक रंगसंगतीच्या पोलीस वसाहती निर्माण होणे आवश्यक आहे. पोलीसदलाच्या भावना आणि अडचणींशी मी सहमत आहे. त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवणारे हे सरकार आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

लोकांना ठाण्यात येण्याची गरजच पडू नयेः पोलीस स्टेशन शेजारीच पोलीस वसाहत इमारत असणे गरजेचे आहे.  त्यामुळे पोलीसांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन कामाचा दर्जा उत्तम राहण्यास मदत होणार आहे. मल्हारपेठ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांना जरब बसावी तर गोरगरिबांना आधार मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकांना पोलीस स्टेशनला येण्याची गरजच पडू नये इतकी इथली कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राहावी असेही ते म्हणाले.

उत्तम रंगसंगती हवीः पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतींच्या ज्या कामाचे भूमीपूजन केले जाते त्या कामाचा दर्जा उत्तम राहावा आणि ती दिलेल्या वेळेत काम पूर्ण व्हावीत. १९९५ पासूनची मागणी या सरकारच्या काळात आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे हा नियतीचा भाग आहे. इमारत ही उत्तम रंगसंगतीची असावी. कामात सातत्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त करतांना त्यांनी पोलीस गृहनिर्माण कामासाठी निधीची कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. मल्हारपेठ पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असून येथे वाहतूक ही मोठ्याप्रमाणात आहे. येथील वाढत्या लोकसंख्येला कायदा व सुव्यवस्था उपलब्ध करून देतांना गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यास या पोलीस स्टेशनमुळे मदत होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पोलिस दलात १२,५०० कर्मचाऱ्यांची भरतीः सातारा पोलीस दलाने कोरोना काळात खुप चांगले काम केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाचे अभिनंदन केले. कायद्याच्या रक्षण करणाऱ्या पोलीस दलाची माणुसकी यावेळी पहायला मिळाली. कोरोना बाधित झालेले पोलीस बरे झाले की लगेच ड्युटीवर हजर झाले. पोलीस दलातील कोविड योद्ध्यांना ५० लाखाचे विमा कवच देण्यात आल्याची माहिती ही त्यांनी दिली. वरिष्ठांनी कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अडचणी संवदेनशीलपणे पहाव्यात असे आवाहन करतांना उपमुख्यमंत्र्यांनी पोलीस दलात १२५०० कर्मचाऱ्यांची नवीन भरती करत असल्याची माहिती ही दिली.

पोलीस वसाहती चांगल्या नाहीतः राज्यात पोलीस वसाहती चांगल्या नाहीत याची जाणीव आपल्याला असून हे सरकार त्यांना उत्तम निवास व्यवस्था देण्यासाठी निश्चितीपणे काम करील असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी दिला. स्मार्ट पोलिसींगची संकल्पना राज्यभर उत्तमपणे राबवल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

पोलीस वसाहतीचे काम वेळेत पूर्ण करूः मल्हारपेठ सारख्या दुर्गम डोंगरी भागात हा २० कोटी रुपयांचा प्रकल्प उभा राहात आहे. या भागात पोलीस स्टेशन उभे राहणे ही काळाची गरज होती. पोलीसांच्या घरांची परिस्थिती बिकट आहे त्यांना चांगले घर मिळावे यासाठी गृह विभागाने आराखडा तयार करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी मला पद स्वीकारतांना दिले होते. उपमुख्यमंत्र्यांनीही अर्थसंकल्पातून ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पोलीस गृहनिर्माणला दिली, असे राज्यमंत्री शंभुराजे देसाई म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा