पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममता दीदीच, केरळमध्ये भाजपला भोपळा!

0
3344
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः पश्चिम बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी जंगजंग पछाडलेल्या भाजपच्या पदरी मात्र निवडणुकीनंतर निराशाच येण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकण्याच्या दावा करणाऱ्या भाजपला तृणमूल काँग्रेसकडून जोर का झटका मिळेल, असे संकेत ओपिनियन पोलमधून मिळाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी कमबॅक करतील आणि केरळमध्येही भाजपला भोपळाच मिळेल, असे स्पष्ट संकेत या पोलमधून मिळाले आहेत.

सी-व्होटर आणि एबीपी न्यूजने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत नेमके कुणाचे सरकार येणार? याचा अंदाज घेण्यासाठी या पाच राज्यांत ओपिनियन पोल घेतला. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपला शंभरही गाठता येणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपने जोरदार आघाडी उघडली खरी, परंतु पश्चिम बंगालचा मतदार ममता दीदींच्या बाजूनेच आहे.

पश्चिम बंगालः २९४ सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत तृणमूल काँग्रेसला १४८ ते १६४ जागा मिळू शकतात. भाजपला ९८ ते १०८ जागा तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला ३१ ते ३९ जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसला ४८ टक्के मते मिळण्याचाही अंदाज आहे.

केरळः केरळमध्ये पुन्हा डाव्यांचाच बोलबोला आहे. माकपच्या नेतृत्वातील डाव्या लोकशाही आघाडीला (एलडीएफ) जवळपास ८३ ते ९१ जागा मिळू शकतात तर काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त लोकशाही आघाडीला ( यूडीएफ) ४७ ते ५५ जागा मिळू शकतात. केरळमध्ये भाजपची परिस्थिती अत्यंत बिकट असून भाजपला ० ते २ जागा मिळू शकतात, असा अंदाज या ओपिनियन पोलमधून बांधण्यात आला आहे.

तामिळनाडूः तामिळी मतदारांचा कौल यावेळी डीएमकेच्या बाजूने आहे. एकूण मतांपैकी ४१ टक्के मते डीएमकेच्या वाट्याला जाऊ शकतात. डीएमके आणि मित्र पक्षांना १५४ ते १६२ जागा मिळू शकतात तर एआयडीएमके आणि मित्र पक्षांना ५८ ते ६६ जागा मिळू शकतात, असा या ओपिनियन पोलचा अंदाज आहे.

आसामः आसाममध्ये भाजप आणि मित्र पक्षांना ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. १२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजप आणि मित्र पक्षांना ६८ ते ७६ जागा तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना ४३ ते ५१ जागा मिळू शकतात, असा या ओपिनियन पोलचा अंदाज आहे. आसाममध्ये एनआरसीचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.

पुद्दुचेरीः केंद्र शासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार नुकतेच कोसळले आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. ३० सदस्यांच्या पुद्दुचेरी विधानसभेत भाजप पुरस्कृत एनडीएची सत्ता येऊ शकते. येथे एनडीएला ४६ टक्के मते मिळू शकतील असा अंदाज बांधण्यात आला आहे. एनडीएला १७ ते २१ आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महायुतीला ८ ते १२ जागा मिळू शकतील, असा या ओपिनयन पोलचा अंदाज आहे.

भाजपला दोन आकडी जागाही मिळणार नाहीत-प्रशांत किशोरः  ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससाठी रणनीती आखत असलेले राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भारतात लोकशाहीसाठी सर्वात महत्वाच्या लढाईपैकी एक लढाई पश्चिम बंगालमधून लढली जाईल आणि बंगालचे लोक हा स्पष्ट संदेश घेऊन तयार आहेत की, त्यांना फक्त आपली बेटीच हवी आहे, असे म्हटले आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी २१ डिसेंबर २०२० रोजी एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी मीडियातील भाजपचे समर्थक पश्चिम बंगालमध्ये भाजपचे हाइप दाखवत आहेत. मात्र भाजपला दोन अंकी आकडा गाठणेही अवघड होईल, असे त्यांनी म्हटले होते. एबीपी न्यूज- सी व्होटरच्या ओपिनियन पोलचा अंदाजही तसाच आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा