राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजपकडून कोरोनाचे राजकारणः बिहारी जनतेला मोफत लसीचे आमिष

0
115

नवी दिल्लीः कोरोनाच्या महामारीचा निवडणुकीच्या राजकारणासाठी वापर होईल आणि मते देणाऱ्या नागरिकांना मोफत लस देऊ,असे आमिष दाखवले जाईल, अशी कल्पनाही कुणी केली नसेल. मात्र भाजपने बिहार निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्यात सत्तेवर आल्यास राज्यातील सर्व नागरिकांना मोफत लस देऊ, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विरोधकांनी भाजपवर टिकेची झोड उठवली आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी भाजप कोरोना महामारीचा वापर करू इच्छिते, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला असून ज्या राज्यात भाजपची सत्ता नसेल तेथील नागरिकांना कोरोनाची लस मिळणार नाही का?, असा सवाल करत विरोधकांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे.

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज भाजपचा बिहार निवडणुकीसाठीचा जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यात सत्तेत आल्यास प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपचे हे आश्वासन जाहीर होताच विरोधकांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. विरोधकांकडून टिकेची झोड उठताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांना याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले. कोरोना लसीची संपूर्ण जगात निर्मिती सुरू आहे. लस तयार झाल्यानंतर लसीचे समान वितरण करण्यासाठी आम्ही एक विस्तृत योजना तयार केली आहे. यात कोणाला प्राथमिकता द्यायची, याचाही विचार केला गेला आहे. प्रत्येक राज्याला कोरोना लस मोफतच मिळणार आहे, असे चौबे म्हणाले.

लसीसाठी भाजपच पक्षाच्या तिजोरीतून पैसे देणार का?:  भाजप लसीसाठी पक्षाच्या तिजोरीतून पैसे देणार आहे का? हा पैसा जर सरकारच्या तिजोरीतून खर्च होणार असेल तर मग एकट्या बिहारलाच लस मोफत कशी काय? कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयाचा फायदा उठवत लोकांना आमिष दाखवण्याचा भाजपचा हा प्रयत्न चुकीचा आहे, असे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

निवडणुका असल्या तरच लस मिळणार का?: भारत सरकारने कोरोना लसीची घोषणा केली आहे. लस आणि खोट्या वचनांची पूर्तता कधी होणार, हे पाहण्यासाठी कृपया तुमच्या राज्यातील निवडणुकीची तारीख पाहा. जेथे निवडणुका, तेथेच फक्त लोकांना कोरोनाची लस मोफत मिळेल, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाणला आहे.

 ज्यांनी भाजपला मते दिली नाहीत,त्यांना लस मिळणार नाही का?: भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांचे काय? ज्या भारतीयांनी भाजपला मते दिली नाहीत, त्यांना लस मिळणार नाही का?, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

निवडणुकीचा लॉलीपॉपः भाजप हा असा पक्ष आहे की, ज्या पक्षाला ही लस लोकांचे जीव वाचवण्याचे साधन किंवा अधिकार वाटत नाही तर ती निवडणुकीतील लॉलीपॉप वाटतो आहे. कोरोना लस हा लोकांचा हक्क आहे. अटीवर द्यायचा निवडणुकीचा लाभ नाही. कोरोनासोबतच भाजपच्या मानसिकतेवरही उपचार करण्याची गरज आहे, अशी टीका काँग्रेस नेते जयवीर शेरगील यांनी केली आहे.

सत्ता नाही आली तर गोरगरिबांकडून लसीचे पैसे घेणार का?: सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार  बिहारमध्ये सत्ता आली नाही तर गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का? असे सवाल करीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

लस आलीही नाही, पण चुनावी जुमला बनलीः शिवसेनेनेही भाजपवर टिकास्त्र सोडले असून हा भाजपचा चुनावी जुमला असल्याचे म्हटले आहे. आजवर कोरोनाची लस अजून आलीही नाही, मात्र चुनावी जुमल्याचा हिस्सा मात्र बनली आहे. सर्व राज्यातील नागरिकांप्रति केंद्र सरकारची जबाबदारी एक समान असायला हवी की नाही?, असे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा