कोरोनामुळे १२ कोटी लोक बेरोजगार, अब्जाधीशांची संपत्ती मात्र १३ खर्व रुपयांनी वाढली!

0
119
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना महामारीच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. जवळपास १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाऊन ते बेरोजगार झाले. त्याचवेळी देशातील सर्वात श्रीमंत १०० अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र १३ खर्व रुपयांची वाढ झाली आहे. ऑक्सफॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘द इनइक्वॅलिटी व्हायरस’ म्हणजेच विषमतेचा विषाणू या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग आणि त्यासाठी करावा लागलेला लॉकडाऊन यामुळे एकीकडे कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे, तर दुसरीकडे सर्वात श्रीमंत अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र ३५ टक्के वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत १०० अब्जाधीशांच्या संपत्तीत १२.९७ खर्व रुपायांची वाढ झाली आहे. ही रक्कम एवढी आहे की, देशातील प्रत्येक नागरिकाला त्यातून ९४ हजार ४५ रुपये दिले जाऊ शकतात. दुसरीकडे एप्रिल २०२० मध्ये प्रत्येक तासाला १ लाख ७० हजार लोकांचे रोजगार, नोकऱ्या किंवा कामधंदा हातातून गेला आहे.

कोरोना काळात देशातील सर्वात श्रीमंत शंभर अब्जाधीशांपैकी पहिल्या ११ अब्जाधीशांनी जो पैसा कमवला त्यातून मनरेगा योजना १० वर्षे चालवली जाऊ शकते किंवा आरोग्य विभागाचा १० वर्षांचा खर्च भागवला जाऊ शकतो. ऑक्सफॅमच्या अहवालातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे ही आर्थिक विषमता आणखी वाढेल, असे सांगण्यात आले आहे.

लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका देशातील असंघटित क्षेत्राला बसला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील १२ कोटी २० लाख  लोक बेरोजगार झाले. त्यापैकी ७५ टक्के लोक असंघटित क्षेत्रातील आहेत. त्यातील ४-५ कोटी लोक बांधकाम क्षेत्र किंवा छोट्यामोठ्या कारखान्यात काम करत होते.

महिलांना जास्त फटकाः या बेरोजगारीचा सर्वाधिक फटका महिलांना बसला आहे. महिलांमधील एकूण बेरोजगारीचा दर १५ टक्क्यांवरून वाढून १८ टक्क्यांवर गेला आहे. ज्या महिलांच्या नोकऱ्या वाचल्या, त्यांच्यापैकी ८३ टक्के महिलांच्या पगारात कपात करण्यात आली आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजच्या सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. एवढेच नाही तर महिलांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम झाला आहे.

३० महिलांना नकोशी गर्भधारणाः ऑक्सफॅमच्या अहवालानुसार कुटुंब कल्याण योजना बंद झाल्यामुळे  २९ लाख ५० हजार महिलांना नको असलेला गर्भ राहिला. १८ लाख महिलांचे गर्भपात झाले, त्यापैकी १० लाख गर्भपात असुरक्षित स्थितीत झाले आहेत. कोरोना महामारीमुळे अंगणवाडी कार्यक्रम विस्कळित झाला आणि गावातील गरिब महिलांना अंगणवाडीमार्फत मिळणाऱ्या आरोग्यसुविधा बंद केल्या गेल्या.

डिजिटल दरी वाढलीः कोरोना महामारीमुळे देशातील डिजिटल दरी वाढली आहे. म्हणजे ऑनलाइन सुविधांच्या बाबतीत विषमता आधीपेक्षा जास्त वाढली. ज्यांनी या संधीचे सोने केले आणि आपल्या कामकाजाची पद्धत बदलली, अशा कंपन्यांना याचा फायदा झाला. या अहवालात उदाहरणादाखल ऑनलाइन कोचिंग करणाऱ्या संस्था बायजू आणि अनअकॅडमीचे उदाहरण दिले आहे. बायजूचे अंदाजित मूल्य १०.८ अब्ज डॉलर तर अनअकॅडमीचे मूल्य १.४५ अब्ज डॉलर आहे. एवढे मूल्य काही काळातच वाढले आहे.

दुसरीकडे भारतातील सर्वात गरीब २० टक्के लोकांपैकी फक्त ३ टक्के लोकांकडेच संगणक आहे आणि केवळ ९ टक्के लोकांचीच इंटरनेटपर्यंत पोहोच आहे.

कोरोना विषाणू इतकीच गरीब-श्रीमंतातील दरी धोकादायकः कोरोना विषाणूबाबत प्रारंभी असे म्हटले गेले होते की, हा सर्वांसाठी समान आहे. परंतु लॉकडाऊन लागू केल्यानंतर गरीब आणि श्रीमंतातील अंतर स्पष्ट दिसू लागले आहे, असे ऑक्सफॅम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बेहार यांनी म्हटले आहे. जेवढा कोरोना विषाणू धोकादायक आहे, तेवढेच धोकादायक गरीब आणि श्रीमंतातील विभाजन आहे, असे ऑक्सफॅम इंटरनॅशनलचे कार्यकारी निर्देशक गॅब्रिएला बूचर यांनी म्हटले आहे.

मुकेश अंबानींनी दर तासाला कमावले ९० कोटी रुपयेः लॉकडाऊनच्या काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांची रग्गड कमाई झाली. लॉकडाऊनच्या सहा महिन्यांच्या काळात मुकेश अंबानी यांनी दर तासाला ९० कोटी रुपयांची कमाई केली. हुरून अंडिया रिच लिस्ट २०२० मध्ये ही माहिती पुढे आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा