राज्यातील सर्व रुग्णालयांचे होणार ‘ऑक्सिजन ऑडिट’!

0
34
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करतानाच ऑक्सीजन ऑडिट करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणेला दिले. ऑक्सीजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असून पोलिस संरक्षणात त्याची वाहतूक करावी आणि परस्पर टॅंकर वळवू नयेत, अशा सूचनाही मुख्य सचिवांनी दिल्या.

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतानाच ऑक्सीजन, रेमडीसीवीरची उपलब्धता, रुग्ण व्यवस्थापन याबाबींचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्ययातून संवाद साधला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग यांच्यासह विशेष कार्यधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले सचिंद्र प्रताप सिंह, अमीत सैनी, अश्वीन मुदगल (ऑक्सिजन उपलब्धतेसाठी), दीपेंद्र कुशवाह (ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी) आणि विजय वाघमारे (रेमडीसीवीर उपलब्धतेसाठी) उपस्थित होते.

राज्यातील सर्व रुग्णालयांचे तातडीने फायर ऑडिट करतानाच आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. यासोबतच सर्व रुग्णालयांचे ऑक्सीजन ऑडीट करण्याचे निर्देश मुख्य सचिव कुंटे यांनी  दिले. त्यामध्ये रुग्णाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ऑक्सीजन दिला जात आहे का, तो वाया जावू नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन होत आहे याबाबींची तपासणी करावी आणि रुग्णालयांमधील ऑक्सीजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणा याठिकाणी ऑक्सीजन गळती होत नाहीये ना तो वाया जात नाही ना, याची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यांत ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर घ्याः सर्व जिल्ह्यांत ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर घेण्यात यावे जेणेकरून सिलिंडर आणि लिक्विड ऑक्सीजनवरील अवलंबत्व कमी करता येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी पीएसए तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सीजन प्लांट उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सीजन टॅंकरला रुग्णवाहिकेचा दर्जाः राज्यात ऑक्सीजन टॅंकरची वाहतूक कुणीही रोखू नये त्यासाठी त्याला रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला आहे. पोलिस संरक्षणात या टॅंकरची वाहतूक करण्यात यावी. कुठल्याही प्रकारे ऑक्सीजन टॅंकर वळविण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात नियोजनबद्धरित्या ऑक्सीजनचा पुरवठा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा