‘बीजमाता’ राहीबाई पोपरे, पोपटराव पवार आणि गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर

0
168
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला नागरी  पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील तीन कर्तबगारांना पद्मश्री जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजारला दुष्काळाच्या खाईतून बाहेर काढत आदर्श गाव बनवणारे पोपटराव पवार,  पारंपरिक बियाणांची बँक तयार करणार्‍या राहीबाई पोपरे आणि सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना ही नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे.

 पोपटराव पवार यांनी पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असलेल्या हिवरे बाजार गावात पाण्याची पेरणी करून गाव जलसमृद्ध केले. पोपटराव पवार हे आदर्श गाव योजनेचेही जनक आहेत. पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्‍नाबरोबरच त्यांनी अनेक सामाजिक प्रश्‍नांवरही काम केले आहे.

 देशात संकरित बियाणांचा प्रचंड वापर वाढल्यामुळे पारंपरिक बियाणेच दुर्मिळ होण्याचा धोका असताना राहीबाई पोपरे यांनी पारंपरिक बियाणाचे संकलन करून त्यांची बँक तयार केली.देशी वाणाच्या बियाणांचे पारंपरिक पद्धतीने संवर्धन केले. राहीबाई पोपरे यांच्या बीज बँकेत 54 देशी पिकांचे 116 जातीचे वाण आहेत. या प्रत्येक बियाणाविषयी राहीबाई यांना तोंडपाठ माहिती आहे.

सुरेश वाडकर यांनी मराठी- हिंदीसह अनेक भाषांत गाणी गायिली आहेत. ओमकार स्वरुपा…, सीने में जलन…, सुरमयी आखियों में… अशी अनेक सुमधूर गाणी त्यांनी  गायिली आहेत. राम तेरी गंगा मैली आणि प्रेमरोग या चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणीही गाजली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा