पालघर हत्याकांडाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तेढ निर्माण केल्यास कारवाईचा गृहमंत्र्यांचा इशारा

0
268
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पालघर जिल्ह्यात तीन प्रवाशांना चोर समजून जमावाने दगडाने ठेचून हत्या केल्याच्या घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणातील आरोपींना शक्य तितकी कठोर शिक्षा करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे कोणीही भांडवल करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात गुरूवारी रात्री दाभाडी- खानवेल मार्गावर जमावाने दोन साधू आणि एका कारचालकाची चोर समजून दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली होती. हे दोन साधू कारने त्र्यंबकेश्वरकडे जात होते. गुरूवारी रात्री शेकडो ग्रामस्थांनी या साधूंची कार अडवून लाठ्याकाठ्या आणि दगडाने ठेचून मारले होते. या खळबळजनक घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी दोन साधू, एक ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.

उगाच धार्मिक तेढ निर्माण करू नकाः गृहमंत्र्यांचा इशारा- दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईहून सुरतला निघालेल्या तिघांची पालघर येथील हत्येची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन हल्ल्यात सहभागी १०१ जणांना अटक केली आहे व उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. कोणीही या घटनेचे भांडवल करून सामाजिक/ जातीय तेढ निर्माण करणार नाही, यावरही सरकार लक्ष ठेवून असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था सर्वोच्च आहे, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. हल्ला करणारे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला आहे, यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाज माध्यमातून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व महाराष्ट्र सायबरला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा