भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला, पंकजा मुंडेचेही त्यामुळेच खच्चीकरण !

2
150
संग्रहित छायाचित्र.

सांगलीः भाजपने कायम ओबीसी नेत्यांना संपवण्याचाच प्रयत्न केला आहे. गोपीनाथ मुंडे यांनाही पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपने आणला होता. त्याला विरोध झाल्यामुळे तो ठराव फेटाळण्यात आला. तसेच आता पंकजा मुंडे यांच्याबाबतीतही केले जात आहे. केवळ ओबीसी असल्यामुळेच पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये खच्चीकरण केले जात आहे, असा गंभीर आरोप सांगली जिल्ह्यातील जतचे भाजपचे माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते प्रकाशअण्णा शेंडगे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे त्या भाजप सोडण्याच्या मनःस्थितीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पंकजांच्या पक्षांतराच्या चर्चेमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह सर्वच नेत्यांची धावाधाव सुरू झाली होती. या नेत्यांकडून भेटगाठी आणि मनधरणीनंतर पंकजा मुंडेंनी बंडखोरी आपल्या रक्तात नाही. पक्षाशी आपण एकनिष्ठ आहोत. पण जे काय बोलायचे आहे, ते 12 डिसेंबर रोजीच बोलणार, असे स्पष्टीकरण मंगळवारीच दिले होते. त्यातच आता प्रकाशअण्णा शेंडगे यांनी भाजपवर गंभीर आरोप केल्यामुळे या वादाला आता नव्याने फोडणी मिळाली आहे. पंकजा मुंडे या केवळ ओबीसी असल्यामुळेच त्यांचे भाजपकडून खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप करतानाच पंकजांनी शिवसेनेत जावे, असा सल्लाही शेंडगे यांनी दिला आहे. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी गोपीनाथ गडावर होणार्‍या कार्यक्रमात पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा