राष्ट्रपती म्हणाले, प्रत्येक आंदोलनाचा सन्मान, परंतु प्रजासत्ताक दिनाचा अपमान दुर्दैवी!

0
139
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः माझे सरकार प्रत्येक आंदोलनाचा सन्मान करते. परंतु काही दिवसांपूर्वी तिरंगा आणि प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवसाचा झालेला अपमान दुर्दैवी आहे, असे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली. देशातील प्रमुख १६ विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींच्या या अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्षांच्या गैरहजेरीतच राष्ट्रपतींना हे अभिभाषण करावे लागले.

काही दिवसांपूर्वी झालेला तिरंगा आणि प्रजासत्ताक दिनाचा अपमान अत्यंत दुर्दैवी आहे. जे संविधान आम्हाला अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार  देते, तेच संविधान आम्हाला कायदे आणि नियमांचे गांभीर्याने पालन करायलाही शिकवते, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

हेही वाचाः शेतकरी आंदोलनः टिकैत यांच्या अश्रूंनी बदलला नूर, घराकडे निघालेले शेतकरी पुन्हा गाझीपूर सीमेवर!

मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव करत केलेल्या या अभिभाषणात राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, सखोल चर्चेनंतर सात महिन्यांपूर्वी तीन कृषी कायदे करण्यात आले. या कृषी सुधारणांचा फायदा देशातील १० कोटीपेक्षा जास्त छोट्या शेतकऱ्यांना तत्काळ मिळणे सुरू झाले आहे. छोट्या शेतकऱ्यांना होणारा फायदा लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी या सुधारणांना पाठिंबा दिला आहे.

सध्या सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांना स्थगिती दिली आहे. माझे सरकार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सन्मान करून त्याचे पालन करेल. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. कदाचित भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच २०२० मध्ये अर्थमंत्र्यांना एक नव्हे तर वेगवेगळ्या पॅकेजेच्या रुपात चार-पाच मिनी अर्थसंकल्प द्यावे लागले. म्हणजे २०२० मध्ये एक प्रकारे मिनी अर्थसंकल्पाचा सिलसिला सुरू राहिला. त्यामुळे हा अर्थसंकल्पही त्या चार अर्थसंकल्पांचाच एक भाग म्हणून बघितले जाईल, याचा मला विश्वास आहे, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा