फडणवीसांच्या दिल्ली भेटीनंतरच परवीर सिंगाचे पत्र कसे? शरद पवारांना कटाचा वास

0
205
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांच्या खळबळजनक लेटरबॉम्बवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे पत्र म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील कटाचा एक भाग असल्याचे संकेत दिले आहेत.

आज रविवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटीनंतर परमवीर सिंग यांचे राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पत्र पुढे आले आहे. सिंग यांनी आधी असे आरोप का केले नाहीत? त्यांची बदली होणार हे कळल्यानंतरच त्यांनी हे आरोप का केले? असा सवाल पवारांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत. पण ते यशस्वी होणार नाहीत. एक गोष्ट स्पष्ट आहे की, आरोप आधी करण्यात आलेले नाहीत. का? माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले आणि त्यानंतर हे आरोप झालेले आहेत, असे पवार म्हणाले.

परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, रेस्टॉरंट्स आणि अन्य आस्थापनांकडून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप केला आहे.

देशमुख यांनी परमवीर सिंग यांचे आरोप फेटाळून लावले असून मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाने परमवीर सिंग यांच्या पत्राच्या वैधतेवरच शंका घेतली आहे.

या आठवड्यात महाराष्ट्र सरकारने परवीर सिंग यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून होमगार्ड्स महासंचालकपदी बदली केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराशेजारी स्फोटकासह स्कॉर्पिओ आढल्यानंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली होती.

या पत्रावर परमवीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. मुख्यमंत्री कार्यालयानेही शनिवारी हीच बाब अधोरेखित केली आहे, असे नमूद करून पवार म्हणाले की, जेव्हा त्यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरून हटवले जाणार आहे, असे कळल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत ते आधी कधीही बोलले नाहीत. ही १०० कोटींची रक्कम कोणाकडे जाणार होती, हेही त्यांनी या पत्रात नमूद केलेले नाही, असे पवार म्हणाले.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराशेजारी आढळलेल्या स्फोटके आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात आपले नाव येणार हे सिंग यांना माहीत असल्यामुळे त्यापासून लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी हे पत्र लिहिले असावे, असे पवार म्हणाले.

आपण मुख्यमंत्री ठाकरे आणि पवार यांना देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत कल्पना दिल्याचे म्हटले आहे. परमवीर सिंग भेटल्याचे पवारांनी मान्य केले मात्र देशमुखांच्या विरोधात थेट आरोपांबाबत ते बोलले नसल्याचे ते म्हणाले. ते मला भेटले आणि बदलीची कारवाई अन्याय्य असल्याचे म्हणाले. माझ्या खात्यात खूपच हस्तक्षेप असल्याचे ते म्हणाले, असे पवार यांनी सांगितले.

सचिन वाझेंना पुन्हा नोकरीत रूजू करून घेण्याचा निर्णय ज्यांनी घेतला, त्या निर्णय प्रक्रियेत मुंबईचे पोलिस आयुक्तही होते. निलंबनानंतर १६ वर्षांनी वाझेंना पुन्हा रूजू करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावरही जाते. वाझेंना परत रूजू करून घेतल्यानंतर त्यांना महत्वाची पोस्टिंग देण्यात आली होती. माझ्या माहितीनुसार त्यांना दिलेल्या पोस्टिंगमध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांची काहीही भूमिका नव्हती. गृहमंत्री उपनिरीक्षकांची नियुक्ती करत नाहीत, असे पवार म्हणाले.

परमवीर सिंग यांच्या पत्राबाबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस किंवा शिवसेनेसोबत आपली चर्चा झालेली नाही, पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण बोललो आहोत. या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. मात्र त्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, याचा निर्णयही मुख्यमंत्रीच घेतील, असेही पवार म्हणाले.

परमवीर सिंग यांच्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी पोलिस प्रशासनात आदर असलेल्या व्यक्तीकडून झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना याबाबत सूचना करणार आहे. केंद्रीय संस्थेमधील कोणाही पेक्षा श्रेष्ठ आणि आदरणीय असलेल्या व्यक्तीचे नाव माझ्या मनात आहे.

फडणवीसांच्या आशेला पुन्हा धुमारेः जोपर्यंत गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपची आंदोलन थांबणार नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालवते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण सभागृहात गृहविभागावर उत्तरे अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा? हे स्पष्ट झालेच पाहिजे,  असे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा