Pegasus Snooping: राहुल गांधी, प्रशांत किशोर यांच्यासह दोन केंद्रीय मंत्र्यांचेही मोबाइलही टॅप

0
247
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः पेगासस स्पायवेअर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याबरोबरच दोन केंद्रीय मंत्र्यांच्या मोबाईल फोनचीही हेरगिरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ‘द वायर’ने हे वृत्त दिले आहे.

फ्रान्सस्थिती फॉर्बिडन स्टोरी या गैरलाभकारी मीडिया संस्थेने पेगाससचा लिक झालेला डेटा प्राप्त केला आहे. जगभरातील १६ मीडिया संस्थांशी फॉर्बिडन स्टोरीने हा डेटा शेअर केला आहे. लीड झालेल्या डेटामध्ये ५० हजाराहून अधिक मोबाइल क्रमांक आहेत. त्यामध्ये ३०० भारतीयांचेही मोबाइल क्रमांक आहेत. त्यातील ४० मोबाइल क्रमांक भारतीय पत्रकारांचे आहेत.

 हेरगिरी करण्यात आलेल्या दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्वीनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांचीही नावे आहेत. वैष्णव यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांची हेरगिरी करण्यात आली, तेव्हा म्हणजेच २०१८-१९ मध्ये ते खासदार होते. विशेष म्हणजे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या मोबाइल नंबरचाही या हेरगिरीत समावेश आहे.

द वायरने दिलेल्या वृत्तानुसार विरोधी पक्षातील तीन बडे नेते, केंद्र सरकारमधील दोन मंत्री, संरक्षण संस्थांचे विद्यमान आणि माजी प्रमुख अधिकारी, उद्योगपतींचाही या स्नूपिंग करण्यात आली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर ही हेरगिरी करण्यात आली होती. इस्त्राएलच्या एनएसओ ग्रुपच्या भारतीय क्लायंटद्वारे पेगासस स्पायवेअरचा वापर करण्याची योजना आखण्यात आली होती.

पेगासस प्रोजेक्ट अंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कमीत कमी दोन मोबाइल नंबर या हेरगिरीचे टार्गेट होते. राहुल गांधींची हॅकिंग करण्याचा प्रयत्न तर या स्तरापर्यंत पोहोचला होता की, त्यांच्या अत्यंत पाच विश्वासू निकटवर्तीयांनाही लक्ष्य करण्याची तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हे पाचही जण राजकारण किंवा सार्वजनिक जीवनात कोणतीही भूमिका बजावत नाहीत. राहुल गांधी आता हे मोबाइल क्रमांक वापरत नाहीत. मात्र त्यांचे हे मोबाइल नंबर लीक झालेल्या डेटाबेसचा भाग आहेत.

एमनेस्टी इंटरनॅशनच्या तांत्रिक प्रयोगशाळेत लीक झालेल्या डेटाबेसमधील मोबाइल नंबरची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत ३७ मोबाइल फोनमध्ये पेगासस स्पायवेअर होता आणि त्यापैकी १० मोबाइल फोन हे भारतीयांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांच्या मोबाइल फोनची फॉरेन्सिक तपासणी होऊ शकलेली नाही. २०१८ च्या मध्यास आणि २०१९ च्या दरम्यान राहुल गांधी जो हँडसेट वापरत होते, तो हँडसेट ते आता वापरत नाहीत. याच कालावधीत राहुल गांधी यांचा मोबाइल क्रमांक हेरगिरीसाठीच्या यादीत समाविष्ट करण्यात आला होता, असे द वायरने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मला काही संशयास्पद व्हॉट्सअप मेसेज आले होते. त्यानंतर आपल्याला लक्ष्य करणे सहस शक्य होऊ नये म्हणून आपण तत्काळ नंबर आणि हँडसेट बदलले, असे राहुल गांधी यांनी द वायरला सांगितले.

प्रशांत किशोरही लक्ष्यः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याही मोबाइलही हेरगिरी करण्यात आली होती, असे एमनेस्टी इंटरनॅशनलने केलेल्या फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे वजनदार नेते अभिषेक बॅनर्जी यांच्याही मोबाइलची एनएसओ ग्रुपच्या एका सरकारी क्लायंटने हेरगिरी केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

इस्राएलचा एनएसओ ग्रुप आपण पेगासस हे स्पायवेअर फक्त सरकारला विकत असल्याचा दावा करतो. मात्र त्यांचे ग्राहक कोण आहेत, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. ममता बॅनर्जी यांचे निवडणूक सल्लागार म्हणून काम करत असलेल्या प्रशांत किशोर यांचा मोबाइल नंबर हेरगिरीसाठीचे टार्गेट ठरवण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भारतात पेगासस स्पायवेअरचा सत्ताधारी भाजपच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून राजकीय माहिती गोळा करण्यासाठी एका अज्ञात एजन्सीमार्फत पेगासस स्पायवेअरचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचा पुरावाच मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा