सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल खुली कराः राज्य सरकारचे रेल्वेला पत्र

0
25
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सुरु करा, असे विनंती करणारे पत्र राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठवले आहे. सर्व सामान्यांना लोकल प्रवासाला मुभा देताना राज्य सरकारने टाइम स्लॉटही पाठवला आहे. मात्र, यावर रेल्वे प्रशासन कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यांत लोकलसह लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली. मिशिन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने टप्प्याटप्प्यात विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी लोक प्रवासाला परवानगी दिली. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण महिलांनाही लोकल प्रवासाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

कामा-धंद्यानिमित्त बाहेर पडणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मात्र प्रवासाची मुभा न दिल्याने त्यांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढत कार्यालय गाठावे लागत आहे. अनेक तांसाच्या प्रवासामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गोष्टींचा सारासार विचार करून सहा महिन्यांनंतर आता लोकल सर्वसामान्यांना खुली करावी असे पत्र राज्य सरकारने रेल्वेला लिहिले आहे. त्यासाठी टाईम स्लॉट देखील सुचविण्यात आले आहेत.

सर्वसामान्य व्यक्तीला पास किंवा तिकिटावर सकाळी पहिल्या लोकलपासून ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्रवास करता येईल. त्यानंतर सर्वसामान्य व्यक्तीस सकाळी ११ ते दुपारी साडेचार पर्यंत आणि रात्री ८ ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची मुभा राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी क्यूआर कोड, पास, ओळखपत्रावर सकाळी ८ ते साडेदहा पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते साडेसातपर्यंत प्रवास कर शकतील. त्याचबरोबर दर एक तासाला लेडिज स्पेशल ट्रेन सोडाव्यात असे पत्रात म्हटले आहे. या स्लॉटला रेल्वेने अंतिम करून मंजुरी दिल्यानंतर सर्वसामान्य प्रवाशासाठी लोकल खुली होणार आहे. त्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची विनंतीही राज्य सरकारने केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा