मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या, आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

0
1111
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः एका गायिका महिलेले बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केल्यामुळे अडचणीत सापडलेले सामाजिक न्यायमंत्री आणि परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मुंबई भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांनी समोर येऊन केलेल्या तक्रारीमुळे काहीसा दिलासा मिळाला असतानाच मुंडे यांच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणूक शपथपत्रात मुंडे यांनी अपत्याबाबत माहिती लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका गायिका महिलेने केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपने मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून पक्ष म्हणून त्यांच्या बाबतीत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगून टाकल्यामुळे धनंजय मुंडे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती अटळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली होती.

हेही वाचाः नवा ट्विस्टः धनंजय मुंडेंवर आरोप करणारी महिला हनी ट्रॅपमध्ये अडकवणारी, भाजप नेत्याची तक्रार

ही चर्चा होत असतानाच मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या त्या महिलेविरुद्धच आंबोली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. ती महिला प्रतिष्ठित व्यक्तींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणारी आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून तिची सखोल चौकशी करावी, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे. मनसेचे मनीष धुरी यांनीही अशीच तक्रार केली आहे. या दोघांच्या तक्रारींमुळे धनंजय मुंडे यांच्यावरील बालंट टळल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचाः धनंजय मुंडेंची आमदारकी गेली तर….परळीत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

धनंजय मुंडेंना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली असतानाच सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली असून धनंजय मुंडे यांनी निवडणुकीच्या आगोदर निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या अपत्यांची माहिती लपवली होती. असे करणे कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून मुंडे यांना प्रतिवादी करावे, असे याचिकेत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा