FlashBack: मित्रों, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर तेव्हा असा दांगडू घालायचो…आता गप्प का? वाचा

0
299
संग्रहित छायाचित्र.

मुंबई/ न्यूजटाऊन विशेषः

 २०१० मध्ये आलेल्या ‘पीपली लाइव्ह’ या सिनेमात एक गाणे होते ‘महंगाई डायन खाए जात है…’ यूपीएचे सरकार असताना पेट्रोल ७१ रुपये लिटर होते तेव्हा या गाण्याचा प्रचंड वापर केला जायचा. सात वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींपासून ते भाजप नेत्या स्मृती इराणींपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर यूपीए सरकारवर सडकून टीका करायचे. अख्खी भाजप रस्त्यावर उतरायची. आता पेट्रोल १०० रुपये लिटरवर पोहोचले तरी आज तेव्हासारखा हायतौबा नाही. सगळेच कसे शांत… शांत… आम्ही तुम्हाला फ्लॅशब्लॅकमध्ये घेऊन जात आहोत… पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढल्यानंतर भाजपचे नेते तेव्हा काय म्हणायचे?  आणि आता ते गप्प कसे?

थोडा इतिहास पाहूः २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव होते ९३ डॉलर प्रतिबॅरल आणि तेव्हा देशात पेट्रोल ७१ रुपये तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होते. सात वर्षांनंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे भाव आहेत ६३ डॉलर प्रतिबॅरल म्हणजेच तब्बल ३० बॅरल प्रतिलिटरने कमी! तरीही देशात पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरहून जास्त आणि डिझेल ८० रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. अशी स्थिती असताना यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेल महाग होते, असे कुणी म्हणेल का?

 सुरूवात करू या बाबा रामदेव यांच्यापासून. यूपीएचे सरकार होते तेव्हा इंडिया टीव्हीच्या आपकी अदालत कार्यक्रमात बाबा रामदेव म्हणतात, ‘ तुम्हाला ७५-८० रुपये लिटरचे पेट्रोल हवे आहे की ३० रुपये लिटरचे? तुम्हाला ३५ रुपये लिटरने पेट्रोल देणाऱ्याला मतदान कराल की ७५-८० रुपये लिटरने देणाऱ्याला? आज तुम्हाला सबसिडीचे सिलिंडर सव्वाचारशे रुपये आणि बिनासबसिडीचे सिलिंडर बाराशे रुपयांना मिळते. तुम्हाला सिलिंडर ३०० किंवा ४०० रुपयांना देणाऱ्यांना मत द्याल की बाराशे रुपयांना देणाऱ्यांना?  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबा रामदेव यांची ही भाषा होती. त्याच बाबा रामदेव यांची भाषा आता बदलली आहे. आज २०२१ मध्ये बाबा रामदेव म्हणतात, ठिक है, मध्यमवर्गाला सरकार काही तरी नक्की देईल, याचा विश्वास आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती थोड्याशा वाढल्यामुळे लोकांच्या खिशातून पैसे निघतील. हा देश तर आपलाच आहे. आपण आपल्या देशासाठी काही तरी देतोय, याचा आम्हाला अभिमान वाटला पाहिजे, असे बाबा रामदेव आता म्हणतात. ज्येष्ठ पत्रकार रणविजय सिंग यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तेव्हा देश आपला नव्हता का?, असा प्रश्न आता बाबा रामदेव यांना कोण विचारणार? पहा व्हिडीओ…

भाजपच्या फायरब्रँड नेत्या स्मृती इराणी तेव्हा पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमती वाढल्या की गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर उतरायच्या. ३ नोव्हेंबर २०११ रोजी पेट्रोलच्या किमती वाढल्या तेव्हा स्मृती इराणींनी ट्विट केले होते ते असे, ‘पेट्रोलच्या किंमती पुन्हा वाढल्या. आम आदमीचे यूपीए सरकार आता खास तेल कंपन्यांसाठी काम करत आहे.’ एवढेच नव्हे तर स्मृती इराणी यांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती हा सत्तेचा अहंकार वाटला होता. त्यांनी १५ जानेवारी २०११ रोजी ट्विट केले होते ते असे, ‘ पुन्हा पेट्रोलच्या किंमती वाढवल्या. महागाईवर यूपीए सार्वजनिक आक्रोशाकडे दुर्लक्ष करत आहे, असे वाटते. सत्तेचा अहंकार, गरिबांच्या गरजांप्रति असंवेदनशीलता’

 हे झाले केंद्रातल्या नेत्यांचे. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे तेव्हा पेट्रोल-डिझेल दरवाढीबद्दल काय विचार होते? आणि आता काय आहेत?  २३ मे २०१२ रोजी देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केले होते ते असे, ‘ ही पेट्रोल दरवाढ अभूतपूर्व आणि अस्वीकारार्ह आहे. काँग्रेसचा हात आम आदमीच्या सोबत नाही तर आम आदमीचा खिसा आणि गळ्यावर आहे.’

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही भूमिका पाहिलीच पाहिजे. यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमती वाढल्या तेव्हा मोदी म्हणाले होते, ‘भाईयों और बहनों, जेव्हा तुम्ही ४ तारखेला मतदान करायला जाल तेव्हा घरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरला नमस्कार करा. ज्या पद्धतीने या लोकांनी गॅस सिलिंडर हिरावून घेतले आहे…लक्षात ठेवा की कशा पद्धतीने गॅस सिलिंडर महागला आहे.’ (तेव्हा गॅस सिलिंडर चारशेच्या आसपास होता, आता त्यासाठी जवळपास पाऊणे आठशे रुपये मोजावे लागत आहेत.)

 पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीवर पोटतिडकीने बोलणारे भाजप नेते आता गप्प आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तर या सगळ्या भाववाढीचा दोष मागील सरकारांच्याच माथी मारला आहे. तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मागील सरकारांना पावले उचलली असती तर आज मध्यमवर्गाला इंधन दरवाढीची झळ बसली नसती, असे ते म्हणाले. सध्याचे सरकार मोदींचे आहे. मागील सरकारांच्या यादीत त्यांच्या २०१४ ते २०१९ या कार्यकाळातील सरकारचाही समावेश होतो. मग त्यांनी नेमकी कोणती पावले उचलली हे सांगून टाकायला काय हरकत आहे? मोदींना त्यांच्या या ट्विटचीही आठवण द्यायला हवी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा