१४ दिवसांत पेट्रोल-डिझेल साडेसात रूपयांहून अधिक महागले!

0
82
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः देशातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत असून त्यामुळे मागील १४ दिवसांत पेट्रोल- डिझेल साडेसात रुपयांहून अधिक महाग झाले आहे.

आज पेट्रोलच्या दरात  प्रतिलिटर ५१ पैसे आणि डिझेलच्या दरात ६१ वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मागील १४ दिवसांत पेट्रोलचे भाव ७ रुपये ६२ पैशांनी तर डिझेलचे भाव ८ रुपये २८ पैशांनी महागले आहेत. देशभरात स्थानिक विक्री कर अथवा व्हॅटच्या आधारावर पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलचे भाव वेगवेगळे आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ८३ दिवस देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ केली नव्हती. ७ जूनपासून मात्र तेल कंपन्यांनी दररोज भाववाढ करण्यात सुरूवात केली आहे. आजची भाववाढ तेव्हापासूनची सलग १४ वी भाववाढ आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आकारले होते आणि त्यानंतर मार्चच्या मध्यास भाववाढ करण्यावर निर्बंध आणले होते.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशातील लोकांचे आधीच हाल सुरू असताना केंद्र सरकार आर्थिकदृष्ट्या कोंडीत सापडलेल्या लोकांकडूनच नफा कमवत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीन दिवसांपूर्वीच केला होता. पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढवण्यामागे नेमके कारण काय, हेच कळत नाही, असे सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा