मंत्र्याच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुल्का यांना समन्स, राजकीय नेत्यांच्याही चौकशीची शक्यता

0
582
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत असताना बेकायदेशीरपणे मंत्र्यांचे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र केडरच्या १९८८ च्या बॅचच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने हे समन्स बजावले असून शुक्ला यांना उद्या, बुधवारी सकाळी ११ वाजता सहायक पोलिस आयुक्त एन. के. जाधव यांच्या समक्ष जबाब नोंदवायचा आहे.

रश्मी शुक्ला या फेब्रुवारी महिन्यात केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्या असून सध्या त्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त महासंचालकपदावर कार्यरत आहेत. शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स बजावण्यात आले आहे. मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्याकडे महत्वाची माहिती असून त्यांचा जबाब या प्रकरणी महत्वाचा ठरणार असल्याचा सायबर सेलला विश्वास आहे, त्यामुळे त्यांना हे समन्स बजावण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीत गरज भासल्यास आणखी काही वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचीही चौकशीही केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी साबर पोलिसांचे एक पथक दिल्लीलाही गेल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र पोलिसांच्या बदल्यांमध्ये कथित भ्रष्टाचार झाल्याप्रकरणाचा गोपनीय अहवाल रश्मी शुल्का यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशावरून राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी अहवाल २७ मार्च रोजी सादर केला होता. २०२० मध्ये रश्मी शुल्का यांनी काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीररित्या टॅप केले होते. नंतर त्यासाठी माफीही मागितली होती, असे कुंटे यांच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानंतर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीकेसी सायबर पोलिस ठाण्यात ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय टेलिग्राफ ऍक्टच्या कलम ३० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रश्मी शुक्लांवर आरोप काय?: रश्मी शुक्ला यांनी जुलै २०२० मध्ये सार्वजनिक कायदा व व्यवस्था धोक्यात असल्याची शंका व्यक्त करत काही लोकांचे फोन टॅप करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी या परवानगीचा दुरूपयोग करून अवैधरित्या अशा काही लोकांचे फोन टॅप केले की ज्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नव्हता, असा आरोप शुक्ला यांच्यावर आहे.

फडणवीसांनी केला होता ६.३ जीबी डेटाचा दावाः मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र पोलिसांत बदल्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा दावा केला होता. माझ्याकडे त्यावेळच्या गुप्त अहवालाची प्रत आहे. शिवाय ६.३ जीबीचा डेचा आहे. त्यात सर्व संभाषणाचा पुरावा आहे, असा दावाही फडणवीसांनी केला होता. हाच डेटा रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांना दिल्याचा आरोप आहे.

रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्याचा आरोपः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी संपर्क साधला होता, असा आरोप स्वतः पाटील यांनीच केला होता. मी अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर रश्मी शुक्ला यांनी माझ्याशी संपर्क साधला होता आणि भाजपला पाठिंबा देण्यास सांगितले होते. भाजपकडे सरकार स्थापन करण्याएवढे संख्याबळ नव्हते, मात्र मी नकार दिला होता, असा आरोप राजेंद्र पाटील याड्रावरकर यांनी केला होता. याड्रावकर यांच्या खुलाश्यानंतर रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता.

बेकायदेशीररित्या मंत्र्यांचेही फोन केले टॅपः रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगसाठी चुकीच्या नावाने परवानग्या घेतल्या होत्या. एकाच्या नावाने परवानगी घेतली आणि फोन टॅपिंग दुसऱ्याच्याच नावाने केली होती. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले होते. हा राइट टू प्रायव्हसीचा भंग आहे, असा आरोप गृह निर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. राष्ट्रघातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनांशी संबंध या प्रकरणाशिवाय इतर परिस्थितीत फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद म्हणून देशातील शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींचे फोन टॅप केले जाऊ शकतात, असेही आव्हाड म्हणाले होते. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा