पाच महिन्यांपूर्वी शशी थरूर यांच्या डिनर पार्टीत शिजला काँग्रेस नेत्यांच्या ‘लेटर बॉम्ब’चा पुलाव!

0
508
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण ढवळून काढणाऱ्या  २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पत्रामुळे तब्बल सात तास चाललेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधींकडेच काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद ठेवण्यावर सहमती झाली असली तरी या ‘लेटर बॉम्ब’चा पुलाव काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सुमारे पाच महिन्यांपूर्वी आयोजित केलेल्या डिनर पार्टीतच शिजला होता. या डिनर पार्टीला हजर असलेल्या अनेक नेत्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. काँग्रेस नेतृत्व आणि पक्ष संघटनेची पुनर्रचना करण्याची मागणी या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठे वादळ उठले होते.

 काँग्रेस पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पुनर्रचनेची गरज आहे. काँग्रेसला पूर्णवेळ आणि लोकांमध्ये प्रभावी असलेला नेता अध्यक्षपदी हवा, अशी मागणी करणारे पत्र २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ७ ऑगस्ट रोजी पाठवले होते. काँग्रेसमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू करण्याची गरज असल्याची चर्चा पाच महिन्यांपूर्वी, मार्चमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत सुरू झाली होती. असे असले तरी या डिनर पार्टीला हजर असलेल्या अनेक नेत्यांनी या पत्रावर स्वाक्षरी मात्र केलेली नाही. या डिनर पार्टीला हजर असलेल्या नेत्यांचा हवाला देऊन हिंदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. या पार्टीला माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, त्यांचा मुलगा कार्ती, सचिन पायलट, अभिषेक मनु सिंघवी आणि मनी शंकर अय्यर हे नेतेही उपस्थित होते. मात्र त्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही.

 शशी थरूर यांनी मला डिनरसाठी बोलावले होते. तेथे पक्षामध्ये संरचनात्मक बदलाच्या मुद्यावर अनौपचारिक चर्चा झाली होती. मात्र त्यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिले जाणार आहे, हे मला कोणत्याही टप्प्यावर सांगण्यात आले नाही, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले.

मला कुणीही सांगितले नाही, म्हणून मी पत्रावर स्वाक्षरी केली नाही, असे काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांनी सांगितले. मार्चमध्ये झालेल्या या डिनरमध्ये पक्षाची पुनर्रचना आणि आपल्या धर्मनिरपेक्ष तत्वाचा पुन्हा अवलंब करण्याच्या मुद्यावर या डिनरमध्ये चर्चा झाली होती. असे एक पत्र लिहिले गेले पाहिजे, अशी सूचनाही याच डिनरमध्ये पुढे आली. त्या सूचनेला कोणीही विरोध केला नाही. परंतु डिनरनंतर माझ्याकडे कुणीही आले नाही, असे अय्यर म्हणाले.

काँग्रेसमध्ये तत्काळ सुधारणांची गरज आहे, यावर माझा विश्वास आहे, म्हणूनच मी या पत्रावर स्वाक्षरी केली असे या डिनरला हजर असलेल्या अन्य एका काँग्रेस खासदाराने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले. हे पत्र व्यक्तीबाबत नसून मुद्यांबाबत आहे. गांधी आणि अन्य नेत्यांनी या पत्रातील संदेश वाचावा, संदेश देणाऱ्यालाच टार्गेट करू नये. या पत्रात कुठलीही लबाडी नाही किंवा खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही, असेही हा खासदार म्हणाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा