जीएसटी फसली, प्रधानमंत्री मोदींनी देशाची माफी मागवीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

0
225
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः आमच्या हक्काचा पैसा केंद्राकडून आम्हाला मिळतं नाही. जीएसटीची पद्धत फसली आहे. जीएसटीच्या मुद्यावरून ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागण्याचीही मागणी केली. देशातील सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी पद्धत रद्द करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. जीएसटीच्या मुद्यावर एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींच्या माफीची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबईच्या सावरकर स्मारकात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. कोरोनामुळे आज पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा निमंत्रितांच्या उपस्थितीत आणि बंदिस्त सभागृहात झाला. यावेळी ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही. क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या पण थोडे लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या असं मी तुम्हाला म्हटले तर कसे? असा सवाल भाजपला करत ठाकरे यांनी हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे खुले आव्हानच भाजपला दिले.

काळ्या टोपीखाली डोके असेल तर भागवतांकडून हिंदुत्व समजून घ्याः काळी टोपी घालणाऱ्या लोकांनी सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्यावे, असा टोला ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नामोल्लेख न करता हाणला. हिंदुत्वावरून एकमेकांनी टोप्या घालू नका. टोपी खाली डोकं आहे की नाही ते ही पाहा. बाबरीच्या वेळी शेपटी घालणारे आम्हाला हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत आहेत.. हिंदुत्वाबद्दल विचारणारे कोण? याचा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. घंटा वाजवा, थाळ्या बडवा हे यांचे हिंदुत्व, असे ठाकरे म्हणाले.

विलासी राजा आणि कळसुत्री बाहुल्याः जे काही देशात सध्या सुरू आहे. ती विचित्र आहे. केवळ सरकार पाडण्यात भाजपला रस आहे. ही परिस्थिती अराजकतेकडे जाणारी आहे. कोरोनाच्या काळात तरी राजकारण करू नका. मी तुम्हाला विलासी राजा आणि कळसूत्री बाहुल्या म्हटले तर? यापुढील काळात कळसूत्रीचा खेळ होणार नाही. भाजपने माती आणि मातेशी इमान राखावे, असे ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा