मुंबईः देशभरात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र लोकांच्या मनात कोरोना लसीबाबत शंका आहेत. त्या शंका दूर होण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनीच स्वतः कोरोनाची लस घेऊन कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
येत्या १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस टोचून घेतली तर जनतेच्या मनातील भीती निघून जाईल,असेही नवाब मलिक म्हणाले.
कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून देशभरात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेतला आहे. केंद्र सरकारने आजच सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या १ कोटी १० लाख लसीच्या डोजची ऑर्डर दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच कोरोना लसीकरणाच्या तयारीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्याच्या सूचना दिल्या. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही मागणी केली आहे.