प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत २० टक्के घट!

0
82
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः भारतातील कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका देशातील विरोधी पक्षनेत्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय माध्यमांकडूनही होत असतानाच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत तब्बल २० टक्के घट झाली आहे. मोदींचे गुणांकन २० टक्क्यांनी घटून ते ६६ टक्क्यांवर आले आहे.

अमेरिकेची डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने जागतिक नेत्यांच्या लोकप्रियतेचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात मोदींच्या लोकप्रियतेच्या गुणांकनात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मॉर्निंग कन्सल्टने भारतातील २,१२६ प्रौढ नागरिकांचे नमुना सर्वेक्षण केले. त्यापैकी ६६ टक्के लोकांनी मोदींची बाजू घेतली तर २८ टक्के लोकांनी मोदींच्या विरोधात आपले मत नोंदवले. विशेष म्हणजे २०१९ मध्ये मोदी सरकारने जम्मू काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांचे लोकप्रियतेचे गुणांकन ८२ टक्के होते. त्यावेळी मोदींच्या विरोधात ११ टक्के लोकांनी मत नोंदवले होते.

मोदींच्या लोकप्रियतेत घट झाली असली तरी जगातील १३ देशांच्या नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक गुणांकन घेऊन ते पहिल्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, ब्रिटन आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेचे सर्वेक्षण मॉर्निंग कन्सल्टने केले. या सर्व नेत्यांत गुणांकनात मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. इटलीचे प्रधानमंत्री मारिओ डॅगी ६५ टक्के गुणांकनासह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा