गुलाम नबी आझादांच्या ‘त्या’ फोनच्या उल्लेखाने प्रधानमंत्री मोदी भावूक, अश्रू अनावर!

0
619

नवी दिल्लीः काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेच्या चार खासदारांना आज राज्यसभेत निरोप देण्यात आला. आझाद यांच्या आठवणींना उजाळा देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. जीवनात सत्ता येत-जात राहते, परंतु ती कशी पचावयाची असे सांगत आझाद यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत मोदींनी त्यांना सॅल्यूटही ठोकला.

गुलाम नबी आझाद यांच्यासह शमशेर सिंह, मोहम्मद फैयाज आणि नाजीर अहमद हे चार राज्यसभा निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त त्यांना निरोप देताना प्रधानमंत्री मोदी यांनी आझाद यांच्या आठवणींना उजाळा देताना गुजरातच्या भाविकांवर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केला. ‘गुजरातच्या भाविकांवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा सर्वात आधी मला गुलाम नबी आझाद यांचा फोन आला. तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. फोनवर गुलाम नबी यांचे अश्रू थांबत नव्हते, असे मोदी म्हणाले.

तेव्हा प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते. त्यांच्याकडे मृतदेह आणण्यासाठी लष्कराच्या विमानाची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यांनी करतो असे सांगितले. त्यानंतर रात्रीही विमानतळावरून गुलाम नबी आझाद यांचा फोन आला. एखादा माणूस जसा आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी घेतो, तशीच काळजी ते घेत होते. जीवनात सत्ता येत-जात राहते. परंतु ती कशी पचवायची हे गुलाम नबी आझाद यांच्याकडून शिकायला मिळते,’ असे सांगत मोदींनी सभागृहातच आझाद यांना सॅल्यूट केला.

 गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. मोदी म्हणाले, आझाद यांच्यानंतर जो व्यक्ती हे पद सांभळणार आहे, त्यांना आझाद यांच्या पावलावर पाऊल ठेवताना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. गुलाम नबी आझाद आपल्या पक्षाची काळजी घेतानाच देश आणि सदनाचीही तेवढीच काळजी घेत होते. ही छोटी गोष्ट नाही.  अन्यथा विरोधी नेत्याच्या रुपात प्रत्येकाला आपला दबदबा कायम ठेवण्याची इच्छा असते. हा मोह कुणालाही होऊ शकतो… परंतु ते सदन आणि देशाला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत… मी शरद पवारांनाही याच श्रेणीत ठेवू इच्छितो, असे सांगत मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही कौतुक केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा