मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात प्रधानमंत्री मोदींचा हातः भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

0
155
संग्रहित छायाचित्र.

भोपाळः  मार्च २०२० मध्ये मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वाची भूमिका निभावली, असा धक्कादायक खुलासा भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केला आहे. इंदूरमध्ये एका जाहीर सभेत त्यांनी हा खुलासा केला.

इंदूरमध्ये भाजपच्या वतीने आयोजित शेतकरी संमेलनात बोलताना विजयवर्गीय म्हणाले की, तुम्ही कुणाला सांगू नका. मी पण आजपर्यंत ही गोष्ट कुणाला सांगितलेली नाही. कमलनाथ यांचे सरकार पाडण्यात जर कुणी महत्वाची भूमिका होती तर ती नरेंद्र मोदी यांची होती, धर्मेंद्र प्रधान यांची नव्हे, ही गोष्ट मी पहिल्यांदा या मंचावरून जाहीर करत आहे. पण ही गोष्ट कुणालाही सांगू नका. मी सुद्धा आजवर कोणाला सांगितलेली नाही, असे विजयवर्गीय म्हणाले. या वेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्राही उपस्थित होते.

विजयवर्गीय यांच्या भाषणाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विजयवर्गीय यांचा हा व्हिडीओ आल्यानंतर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. आमचे आरोप खरे ठरल्याचे काँग्रेस प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी म्हटले आहे.

देशाचे प्रधानमंत्री काँग्रेसची निवडून आलेली संवैधानिक सरकारे असंवैधानिक मार्गाने पाडतात, असे स्वतः भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीयच सांगत आहेत. मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार मोदींनी महत्वाची भूमिका बजावून पाडले. काँग्रेसचे आरोप खरे ठरले, असे सलूजा यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा