प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता देशाला संबोधित करणार

0
121
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सायंकाळी ६ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. स्वतः मोदी यांनीच ट्विट करून ही माहिती दिली आणि हा संबोधन ऐकण्याचे आवाहनही केले आहे.

प्रधानमंत्री मोदी नेमके कोणत्याविषयावर देशाला संबोधित करणार आहेत, हे स्पष्ट करणार आलेले नाही. मात्र नजिकच्या काळातील सण आणि येऊ घातलेल्या हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर ते देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीबाबत बोलतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मार्चअखेरीस देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर मोदींचे हे देशाला सातवे संबोधन असेल. लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी जूनपासून देशातील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येत आहेत.

देशात टप्प्याटप्प्याने अनलॉक केले जात असताना सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी पाहता कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रधानमंत्री मोदी देशातील जनतेला खबरदारी घेऊन सण साजरे करण्याचे आवाहन करू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.

देशात आतापर्यंत ७६ लाखांच्या आसपास लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र मागील तीन महिन्यांपासून दिवसाकाठी ५० हजारांच्या आसपास कोरोना बाधित रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत देशात ४६ हजार ७९० नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ७५ लाख ९७ हजार  ६३ वर पोहोचली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा