लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचे छायाचित्र हटवले!

0
170
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र हटवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुका असलेल्या पाच राज्यांतील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या लसीकरण प्रमाणपत्रावर आचारसंहिता लागू असेपर्यंत मोदींचे नाव आणि छायाचित्र असणार नाही. निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

 केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर नुकताच केला. या पाच राज्यांत १० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान मतदान होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच या पाचही राज्यांत आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर या पाच राज्यांतील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव आणि छायाचित्र हटवण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली होती. निवडणूक आयोगाच्या या सूचनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लगेच पावले उचलली असून लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचे छायाचित्र हटवण्यात आले आहे.

निवडणूक आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विधानसभा निवडणुका असलेल्या पाच राज्यांमध्ये आता प्रधानमंत्र्यांचे नाव आणि छायाचित्र वगळून कोरोना लसीकरण प्रमाणपत्र जारी केले जाईल. त्यासाठी कोविन प्लॅटफार्मवर आवश्यक फिल्टर लावण्यात आले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

याआधी आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी विधानसभा निवडणुकीच्यावेळीही लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींच्या छायाचित्रावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता. या लसीकरण प्रमाणपत्राच्या माध्यमातून भाजपचा प्रचार केला जात असल्याचा विरोधकांचा आक्षेप होता. त्याही वेळी लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचे छायाचित्र हटवण्यात आले होते. विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यात लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचे छायाचित्र हटवण्याचा केलेला बदल तात्पुरता असेल. आचारसंहितेची अंमलबजावणी संपल्यानंतर लसीकरण प्रमाणपत्रावर पुन्हा मोदींचे छायाचित्र आणि नाव येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा