धक्कादायकः जळगावमध्ये वसतिगृहातील मुलींना पोलिसांनी कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडले

0
1705
संग्रहति छायाचित्र.

जळगाव/मुंबईः  जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील तरूणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलिस कर्मचारी आणि बाहेरील व्यक्तींनी वसतिगृहात येऊन हा प्रकार केल्याची माहिती आहे. या प्रकरणी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

जळगावच्या गणेश कॉलनी भागात महिला व बालकल्याण विभागामार्फत आशादीप शासकीय महिला वसतिगृह चालवले जाते. या वसितगृहात निराधार, अन्याय व अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवाऱ्याची सोय केली जाते. मात्र याच वसतिगृहात गैरप्रकार सुरू असल्याच्या तक्रारी येत होत्या.

मंगळवारी जननायक फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांनी वसतिगृहाला महिला व मुलींची भेट घेतली. तेव्हा अनेक धक्कादायक बाबीसमोर आल्या. जननायक फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांना वसतिगृह प्रशासनाने आतमध्ये प्रवेश दिला नाही. त्यामुळे मुलींनी खिडकीतूनच त्यांच्यावर बेतलेले प्रसंग ओरडून सांगितले. या मुलींना बोलण्यासही कर्मचाऱ्यांकडून मज्जाव करण्यात येत होता.

१ मार्च रोजी काही पोलिस कर्मचारी आणि बाहेरील पुरूषांनी वसतिगृहात येऊन मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला लावले. काही कर्मचाऱ्यांच्या संगनमताने चौकशीच्या नावाखाली पोलिस आणि बाहेरील लोकांना वसतिगृहात प्रवेश देण्यात येतो आणि अनैतिक कृत्ये केली जातात. अनैतिक कृत्य करण्यास नकार देणाऱ्या मुलींना मारहाण करण्याची धमकी दिली जाते, अशी कैफियत या मुलींनी मांडली.

या घटनेचे जोरदार पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या मुद्याकडे लक्ष वेधले. अध्यक्ष महोदय, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढे एक सेकंद नजरेत आणा.. तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या माझ्या आई बहिणीला नग्न करून, कपडे काढून नाचायला लावले जाते आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. येथे मृत मनाचे आमदार आहेत का? आमचे मन जीवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले.

जी घटना घडली त्याची संपूर्ण माहिती घेण्याचे काम सुरू आहे. व्हिडीओ तसेच सर्व माहिती एकत्र केली जात असून जबाबही नोंदवले जात आहेत. याची संपूर्ण चौकशी केल्यानंतर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा