न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या तपासाशी संबंधित पोलिस अधिकाऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू

0
390
संग्रहित छायाचित्र.

उस्मानाबादः न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाचा तपास नव्याने केला जाऊ शकतो, अशी घोषणा राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी केल्याच्या पाचव्याच दिवशी न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आलेले पोलिस अधिकारी रविंद्र भारत थोरात यांचा ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने 13 जानेवारी रोजी उस्मानाबादेत मृत्यू झाला.

रविंद्र थोरात हे उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात( एसीबी) कार्यरत होते. न्यायमूर्ती लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांच्या न्यायालयीन सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ह्रदयगती बंद पडल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष राज्याचे तेव्हाचे गुप्तवार्ता प्रमुख बर्वे यांनी काढला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र थोरात हे तेव्हाच्या तपास पथकाचे प्रमुख संजय बर्वे यांच्या टीममध्ये कार्यरत असताना न्या. लोया यांच्या मृत्यूशी संबंधित संवेदनशील फाइल्स आणि कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयात पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

रविंद्र थोरात यांनी 13 जानेवारी रोजी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना सोलापूर येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती खालावत हेली आणि रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे रविंद्र थोरात यांनी न्या. लोया मृत्यूप्रकरणी दोन पातळ्यांवर काम केले होते. 2014 मध्ये न्या. लोया यांचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची जबाबदारी रविंद्र थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती. न्या. लोया यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येत नसल्याचे रविंद्र थोरात यांनी कळवले होते, असे सांगण्यात येते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या नेतृत्वात न्या. लोया यांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी तपास पथकाची स्थापना केली होती. रविंद्र भारत थोरात हे त्या पथकाचे सदस्य होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा