वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंना क्राईम ब्रँचमधून हटवणार, गृहमंत्री देशमुखांची घोषणा

0
629
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्षाच्या निशाण्यावर असलेले वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. वाझे यांना क्राईम ब्रँचमधून हटवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले.

 गेल्या दोन दिवसांपासून मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यावरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीचा हवाला देत सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांचा खून करून मृतदेह खाडीत फेकल्याचा गंभीर आरोप केला होता.

या प्रकरणावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधान परिषदेत निवेदन केले. त्यावेळी त्यांनी सचिन वाझे यांची बदली करण्यात येईल, अशी घोषणा केली. गृहमंत्री देशमुख यांनी निवेदनाच्या सुरूवातीलाच राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र विरोधकांनी सचिन वाझेंवर काय कारवाई करणार अशी विचारणा करत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या ते क्राईम ब्रँचमध्ये कार्यरत आहेत. तिथून हलवून त्यांची दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल. निष्पक्षपणे चौकशी करून जो कुणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, असे देशमुख म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा