शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गाझीपूर सीमेवर पोलिसांनी उभारले खिळे आणि तारांचे कुंपण

0
118
छायाचित्र सौजन्यः twitter/Rahul Gandhi

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी गाझीपूर सीमेवर खिळे आणि काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. तर सिंघू सीमेवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सहा स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. धरणे सुरू असलेल्या उड्डाणपुलावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दिल्लीहून गाझियाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर सहा स्तरीय बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. त्यात काटेरी तारांचे कुंपणही टाकण्यात आले आहे. काँक्रिटचे तीन फूट उंच दोन- दोन स्लॅब ठेवून क्राँक्रिटची भींत उभारण्यात आली आहे. त्यानंतरच्या दोन स्तरामध्ये लोखंडी बॅरिकेड्स लावले आहेत. टीकरी सीमेवरही शेतकरी धरणे देत असलेल्या ठिकाणी अशाच भींती उभारण्यात आल्या आहेत. रस्त्यावर सिमेंटचे मोठमोठे स्लॅब ठेवण्यात आले आहेत आणि बॅरिकेडिंगसोबत रस्त्यावर खिळेही ठोकण्यात आले आहेत.

याच भींती, खिळे आणि तारांच्या कुंपणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत सरकार, पूल बांधा, भींती नव्हे, असे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही याच मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. प्रधानमंत्री जी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध? असे त्यांनी म्हटले आहे.

तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाला हमीभावाची खात्री देणारा कायदा करण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारी रोजी देशव्यापी चक्का जामची हाक दिली आहे. या दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळात हे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

संयुक्त किसान मोर्चाचेही टिकास्त्रः तुम्ही आम्हाला खिळे किंवा बॅरिकेड्सने रोखू शकत नाही. आम्ही शांत होतो, शांत आहोत आणि शांतच राहू. तुमच्या भाडोत्री गुंडाकरवी आम्हाला भडकवू नका, असे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा