मराठा आरक्षण आंदोलनामागे राजकीय षडयंत्र; ओबीसी-मराठा वाद लावण्याचा डावः चव्हाण

0
116
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मराठा आरक्षणाबाबात काही पक्षांकडून राजकीय षडयंत्र केले जात असून त्यांना ओबीसीविरुद्ध मराठा असा वाद लावून राजकीय फायदा उचलायचा आहे. जे लोक समाजासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत, त्यांना बदनाम करण्यासाठी राजकीय लोक मराठा आरक्षण आंदोलनात घुसले आहेत, असा गंभीर आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना चव्हाण म्हणाले की, यापूर्वीही मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्याचा विषय कुठेही नव्हता आणि आजही नाही. राज्य सरकारचीही तशीच भूमिका आहे. जेथे ओबीसी विरुद्ध मराठा हा प्रश्नच येत नाही, तिथे तो आला कसा? या मागे राजकीय षडयंत्र आहे. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद लावण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे. या आंदोलनामागे कोणत्या राजकीय पक्षाचे लोक आहेत, हे तुम्हीच पाहा, असेही चव्हाण म्हणाले.

 राज्यात मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून आंदोलने केली जात आहेत. आंदोलने करणे हा तुमचा हक्क आहे, पण ते तुम्ही कुणाच्या विरोधात करत आहात? सरकारला विरोध करण्यापेक्षा न्यायालयात मदत करा. आंदोलने करण्यापेक्षा चांगले आणि वेगळे मुद्दे तुमच्याकडे असतील तर ते आम्हाला सांगा, आम्ही न्यायालयात बाजू मांडू, असेही चव्हाण म्हणाले.

 मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही, ते कमी पडतेय असे आरोप वारंवार केले जात आहेत, ते चुकीचे आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकार म्हणून आम्ही योग्य भूमिका मांडत आहोत. सरकारकडे चांगले वकील नाहीत, असे ज्यांना वाटतेय, त्यांना आम्ही आवाहन करतो की, त्यांनी आमच्यासोबत यावे. मराठा समाजाकडेही निष्णात वकील आहेत. त्यांना आमचा पाठिंबाच आहे. सरकारने मुकूल रोहतगी, पटवालिया, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासारखे मोठे वकील दिले आहेत, असेही चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा