राजकीय भूकंप: राष्ट्रवादीत उभी फूट, अजित पवारांशी हातमिळवणी करून पुन्हा राज्यात भाजप सरकार,फडणवीस मुख्यमंत्री!

0
115

मुंबई: राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच राज्याच्या राजकारणाने रात्रीतून वेगळी कलाटणी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करून भाजपने राज्यात पुन्हा सरकार स्थापन करून सर्वांनाच जबर हादरा दिला. आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित घडामोडीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

सरकार स्थापनेच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पुढाकाराने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज सायंकाळपर्यंत नवे सरकार स्थापन होण्याची तयारी जवळपास पूर्ण  झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानक कल्टी मारली. त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि शरद पवारांच्या नवे सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नांना तिलांजली दिली. अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडवणीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आणि राज्यपालांनी तातडीने फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. या शपथविधीनंतर राज्यपालांनी लगेच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केली आणि केंद्राने लगेचच राष्ट्रपती राजवटही मागे घेतली. राज्यपालांनी फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे.

 अजित पवारांच्या मागे 22 आमदार?

अजित पवारांनी घेतलेला निर्णय वैयक्तिक असून त्यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, असे शरद पवार यांनी सांगितले असले तरी अजित पवारांच्या पाठिशी राष्ट्रवादीच्या 54 पैकी 22 आमदार असल्याचे समजते. अजित पवार दावा करतात त्याप्रमाणे खरेच 22 आमदार त्यांच्या पाठिशी आहेत की नाही, हे  देवेंद्र फडणवीस विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जातील तेव्हाच कळेल. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटल्याची आपणाला कोणतीही माहिती नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर पक्ष आणि कुटुंबातही फूट पडल्याचे व्हॉट्सअप स्टेट्स शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी ठेवले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा