सुशिक्षितांची राजकीय निरक्षरता सर्वांत धोकादायक

0
477

शिक्षित असूनही राजकारणापासून फारकत घेतलेल्या लोकांबाबत पाश्चात्य राजकीय विचारवंत बर्तोल्त ब्रेख्त म्हणतात की, ‘सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावे तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, औषधांच्या किंमती सारे काही राजकीय निर्णयांवरून ठरते. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमानसुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो.  त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की, त्याच्या राजकीय अज्ञानातूनच शोषणकारी व्यवस्था जन्माला येते.’

  • आर.एस.खनके, पुणे

इंग्रजी मध्ये सातत्याने बोलले जाणारे आणि वैश्विक मूल्य असलेले एक सुभाषित आहे. “Do not follow the majority, follow the right way” याचे ढोबळ मानाने मराठी  भाषांतर केल्यास ते ‘गर्दीच्या मार्गाने  नाही  तर योग्य /अचूक दिशेने वाटचाल करावी.’ असे करता येते.हे सुभाषित विचारी व्यष्टी आणि समष्टीला लागू पडते.  झुंडीला मात्र नाही. आजच्या स्थितीत राजकीय पक्षांतराच्या निमित्ताने ‘सत्तेकडे कोटीच्या कोटी उड्डाने’ घेतली जात असल्याचे रोज पहायला मिळत आहे. ‘अशी संधी पुन्हा येणे नाही’ असे समजून गर्दीत उडी घेणारांचा ऊत आला आहे. म्हणूनच विरोधी पक्षातून पक्षांतराचे जथ्थेच्या जथ्थे आणि प्रवेश सोहळे आज पाहायला मिळत आहे. या पक्षांतरितांमध्ये सत्तेच्या बाहेर राहिलेला कुणीही विचारी आणि स्वत:चा भक्कम जनाधार असलेला नेता या लाटेत पक्षांतर करताना दिसत नाही. सातत्याने सत्तेच्या आश्रयाला राहून आपली सरदारकी आणि सुभेदारी राखलेले लोक या गर्दीत दिसत आहेत. हे तेच लोक आहेत जे सत्तेच्या मळ्यात राहून माया जमवत गब्बर, निबर आणि मातब्बर झालेले आहेत. अशी लोकं जिथे होती तिथे आणि जातील तिथे हाडाचे शिलेदार कमी आणि मेद अधिक असेच आहेत. या लोकांमध्ये निष्ठा आणि सत्व औषधालाही सापडत नाही. जातील तिथे सन्मानही नाही. गडकरींसारख्या राष्ट्रीय नेत्याने अशा लोकांची उंदरं म्हणून केलेली निर्भर्त्सना आणि तरीही  धुमधडाक्यात पक्षांतर. हे चित्र स्वाभिमान आणि पाठीत मनका नसल्याचे द्योतक आहे. 

12 वेळा विधिमंडळात जावून आमदार राहिलेले सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख सत्ता असेल नसेल पण विचार आणि पक्षनिष्ठा जोपासत आजही सन्मानाने, भक्कमपणे आपल्या पायावर उभे आहेत. सत्तेच्या कित्येक लाटा आल्या आणि गेल्या, मात्र त्यांनी आपल्या विचाराशी नाळ तोडली नाही. एकूणच आज महाराष्ट्राला विचारांचा नाही तर सत्तापिपासू वृत्तीचा कैफ चढला आहे. शिवराय, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या  विचारांपासून महाराष्ट्र पराडमुख होत झुंडीने एका उथळ आणि लाचार वाटेवर चालला आहे. अनेकांनी फक्त सत्तेत रहाण्यासाठी आणि सत्तेची फळे चाखण्यासाठी आपली सरदारकी टिकवून ठेवल्याची मोठी ऐतिहासिक परंपरा महाराष्ट्राला आहे. शिवकालीन, स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश राजवटीत आणि आता स्वातंत्र्यानंतरच्या प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेत या पारंपरिक सत्ताभोगी  मनोवृत्तीने प्रत्येक नव्या राजकीय वळणावरच्या प्रवाहाशी जुळवून घेत आपले दरबारी स्थान टिकवून ठेवलेले आहे. आजचे पक्षांतर आणि त्याची प्रेरणा सत्तेची उब आणि लागलेली चटक हीच आहे. त्यात ना विचार, ना विचारसरणी. ना कुठल्या तत्वाची बांधिलकी आहे! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तो क्षण.


स्वातंत्र्यानंतरच्या प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेत या पारंपरिक सत्ताभोगी  मनोवृत्तीने प्रत्येक नव्या राजकीय वळणावरच्या प्रवाहाशी जुळवून घेत आपले दरबारी स्थान टिकवून ठेवलेले आहे. आजचे पक्षांतर आणि त्याची प्रेरणा सत्तेची उब आणि लागलेली चटक हीच आहे. त्यात ना विचार, ना विचारसरणी. ना कुठल्या तत्वाची बांधिलकी आहे ! 

विविध भाषा, प्रांत, जातीसमूह, विचार आणि तत्वज्ञानाच्या विविध परंपरेने नटलेल्या  भारतीय परंपरेसाठी आणि त्याच्या मुळाशी असलेल्या भिन्न विचारप्रवाहाच्या बहुपक्षीय लोकशाहीला असा विचारविहीन सत्तालोलुप प्रवाह घातक आहे. याबाबत नुकतेच नितीन गडकरी यांनी एका भाषणात व्यक्त केलेले मत नोंद घेण्यासारखे आहे. ते म्हणतात, ‘या देशाला विचारभिन्नतेपासून नाही तर विचारशून्यतेपासून धोका आहे. जिकडे सत्ता तिकडे लोक पळताना दिसत आहेत. जहाज बुडायला लागलं की उंदरं उड्या मारायला लागतात. तसे या लोकांचे झाले आहे. सत्तेशिवाय या लोकांना करमत नाही. सत्तेच्या मागे धावणारे असे लोक इतिहास लिहू शकत नाहीत. इतिहास तेच लिहू शकतात जे आपल्या विचारांवर ठाम असतात. सत्ता असो अथवा नसो, आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे.’ गडकरींचे हे बोल आजच्या विचारविहीन राजकीय पक्षांतर प्रलय प्रवाहाचे स्पष्ट दर्शन घडवतात. तसेच दलबदलू लोकांच्या इभ्रतीची लक्तरे वेशीला टांगतात. परंतु ‘सत्तातुरणां न भयं न लज्जा.’ या पक्षांतर गर्दीतल्या लोकांना कुठल्याही मूलगामी विचारसरणीचे अधिष्ठान नाही. विचाराने राजकीय जडणघडण झालेला  एकही चेहरा या गर्दीत दिसत नाही. ही बाब लक्षात घेतल्यास अशा लोकांच्या असण्याने आणि जाण्याने एखाद्या पक्षावर संख्यात्मक फ़रक पडत असला तरी गुणात्मक फरक पडत नाही, मात्र लोकशाहीत एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे तत्व स्वीकारले असल्याने या गर्दीचा लाभ मतपेटीतून सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी अशा शिरगणतीचा फटका मातृपक्षाला बसतो. सत्ता समतोलासाठी विरोधी पक्ष कमजोर करण्याचा हा कल चांगला नाही. 

     देशस्तरावर व्यापक हिताचा विचार करता सत्ता पक्ष बळकट होताना विरोधी पक्ष कमजोर होणे सर्वसमावेशक आणि समतोल लोकशाहीला (Inclusive and Balanced Democracy) आणि भारतीय व्यामिश्र संस्कृतीला घातक आहे. भारतीय समाजाची  विविधतेने नटलेली वीन (Fabric) यातून अशक्त होतेय. विविधतेत एकता असलेले ‘मिले सुर मेरा तुम्हारा . . . तो सुर बने हमारा…’ हे भारतीयत्वाचे एकात्मिक मूल्य अशक्त होतेय. बहुलतावाद (pluralism) पराभूत होतोय. भाषिक आणि सांप्रदायिक  बहुसंख्यकवादाला (Mejoritarianism) खतपाणी मिळत असल्याने आजच्या या बदलत्या राजकीय प्रवाहात धोकादायक बाब म्हणजे आपल्या समाजातील एक मोठा वर्ग गप्प आहे. हा तोच विचारविहीन  वर्ग आहे, ज्याला आपला  व्यापक समाज  सुशिक्षित, चांगले, गुणी आणि सभ्यतेची विशेषणं लावतो. जो वर्ग ‘राजकारण हे आपल्यासारख्या चांगल्या सुशिक्षित लोकांचे काम नाही.’ असा बावळट गुलामी संस्कार स्वत:वर आणि एकूणच भारतीय समाजमनावर करत आला आहे. या संस्काराचे दुर्दैवी फलित म्हणून की काय, संख्येने मोठ्याप्रमाणावर असलेला आणि सत्तांतर घडविण्याचे प्रचंड सुप्त सामर्थ्य असलेला हा वर्ग देशाच्या राजकारणात आणि सत्ताकारणात उदासीन असल्याने देशसंचालनात कुठेही अग्रस्थानी नाही. म्हणूनच आपल्याकडे उच्च विद्येशी फारकत असलेली नेतेमंडळी शेवटच्या श्वासापर्यंत कायदे निर्माते म्हणून संसदेत आणि विधिमंडळात देशाची व राज्याची धोरणे ठरवतात तर उच्चशिक्षण घेत स्वत:ला चांगले म्हणवून घेणारे, ‘गुणी बाळ’ असे नाव कमावलेले उच्चविद्याविभूषित शिक्षित लोक चाकरमाने होवून या कायदेनिर्मात्यांनी  ठरवलेली धोरणे राबविण्याची तालीम बजावताना दिसतात.


नितीन गडकरी यांनी एका भाषणात व्यक्त केलेले मत नोंद घेण्यासारखे आहे. ते म्हणतात, ‘या देशाला विचारभिन्नतेपासून नाही तर विचारशून्यतेपासून धोका आहे. जिकडे सत्ता तिकडे लोक पळताना दिसत आहेत. जहाज बुडायला लागलं की उंदरं उड्या मारायला लागतात. तसे या लोकांचे झाले आहे. सत्तेशिवाय या लोकांना करमत नाही. सत्तेच्या मागे धावणारे असे लोक इतिहास लिहू शकत नाहीत. इतिहास तेच लिहू शकतात जे आपल्या विचारांवर ठाम असतात. सत्ता असो अथवा नसो, आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे.’ 

 “सुशिक्षित वर्गाने राजकारण या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अन्यथा अंगठेबहाद्दर अर्धशिक्षितांचे तुम्हाला गुलाम व्हावे लागेल. . .!” संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या सुशिक्षित वर्गाला हा संदेश दिलेला होता तो याचसाठी!. डॉ. आंबेडकरांना कुठलीही कौटुंबीक राजकीय पार्श्वभूमी, वारसा, आर्थिक पाठबळ नसताना आपल्या विद्वत्तेच्या जोरावर बौद्धिक सामर्थ्याने जी धोरणात्मक दिशा भारताला दिली त्यावरून बुद्धीजीवी काय करु शकतो याची कल्पना येते. ब्रिटिश इंडिया सरकारच्या मंत्रिमंडळात असताना सिंचन, उर्जा, कामगार, बांधकाम मंत्री म्हणून काम करताना त्यांनी तयार केलेली ब्लूप्रिंट आजही तितकीच लागू आहे. अलीकडचे उदाहरण म्हणजे एपीजे अब्दुल कलाम यांचे आहे. पण शिक्षण घेवून चाकरीच करायची आणि त्यातच धन्यता मानायची अशा पराभूत मानसिकतेच्या संस्कृतीला आणि काहीही न बोलणे यातच शहाणपण असल्याचे अंगी रुजवून घेतलेल्या  शिक्षितांनी गब्बर आणि निबर लोकांना न बोलून रानमोकळे करून दिल्याने या ‘निसटावंतां’ची फौज वाढीला लागली.

आज आपल्या समाजातील या कथित सभ्य आणि सुशिक्षित वर्गाची  राजकीय निरक्षरता, निष्क्रियता आणि निरसता अशिक्षितांच्या झुंडीला सहाय्यभूत ठरत आहे. अशा लोकांबाबत पाश्चात्य राजकीय विचारवंत बर्तोल्त ब्रेख्त यांनी मांडलेले विचार या वर्गाच्या प्रकृतीची चिरफाड करणारे आणि विचारीजनाला चिंतन करायला लावणारे आहेत. ते म्हणतात “सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावे तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, औषधांच्या किंमती सारे काही राजकीय निर्णयांवरून ठरते. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमानसुद्धा वाटतो आणि छाती फ़ुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो.  त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की, त्याच्या राजकीय अज्ञानातूनच शोषणकारी व्यवस्था जन्माला येते.”

लेखक सामाजिक व राजकीय घडामोडींचे भाष्यकार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा