आरूसा आलम यांच्यावरून राजकीय घमासान, कोण आहे ही कॅप्टन सिंगांची पाकिस्तानी मैत्रीण?

0
385
संग्रहित छायाचित्र.

चंदीगडः पाकिस्तानी पत्रकार आरूसा आलम यांची अचानकच पंजाबच्या राजकारणात एन्ट्री झाल्यामुळे घमासान सुरू झाले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नव्या राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी अमरिंदर सिंग यांची पाकिस्तानी मैत्रीण आरूसा आलम यांचा मुद्दा उकरून काढला आहे. त्यामुळे पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदरसिंग रंधावा यांनी आरूसा आलम यांचे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी असलेल्या कथित संबंधांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

 चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

रंधावा यांच्या आदेशानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एकानंतर एक ट्विट करत आपली बाजू मांडली आहे आणि आरूसा आलम आणि सोनिया गांधी यांचे फोटोही ट्विट केले आहेत. आरूसा आलम गेल्या १६ वर्षांपासून भारतात येतात आणि या काळात केंद्रात काँग्रेस आघाडीचेच सरकार होते. तेव्हा आरूसा आलम केंद्र सरकारची परवानगी घेऊन भारतात येत असे. त्यानंतरही आरूसा आलम फक्त केंद्र सरकारचीच परवानगी घेऊन भारतात येते, असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटले आहे.

संग्रहित छायाचित्र.

कोण आहेत आरूसा आलम?: आरूसा आलम आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे घनिष्ठ संबंध आहेत. पंजाबच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळातही आरूसा आलम हे नाव चांगलेच माहीत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या ‘द पीपल ऑफ महाराजा’ या पुस्तकात आरूसा आलम यांचा उल्लेख मित्र असा केला आहे.

 प्राप्त माहितीनुसार आरूसा आलम या पाकिस्तानी पत्रकार आहेत. त्या संरक्षणविषयक बातम्या कव्हर करतात. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि आरूसा आलम यांची भेट २००४ मध्ये झाली. तेव्हापासून आरूसा आलम यांचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या घरी येणे-जाणे आहे. २०१७ मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्या शपथविधी सोहळ्यालाही आरूसा आलम उपस्थित होत्या. त्यांच्यासाठी अमरिंदर सिंग यांनी खास व्यवस्था केली होती.

संग्रहित छायाचित्र.

 आरूसा आलम या पाकिस्तानच्या राजकारणातील प्रसिद्ध चेहरा अकलीन अख्तर यांच्या कन्या आहेत. आरूसा यांच्या आईला राणी जनरल म्हणून ओळखले जाते. आरूसा आलम या विवाहित आहेत. त्यांना दोन मुले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा