मंदिरावरून राजकारण जोरात, राजकीय नेत्यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा मतांच्या बेगमीचीच चिंता!

0
123

मुंबईः कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेली मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यावरून राज्यात जोरदार राजकारण पेटले आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह विरोधातील सर्वच छोट्या मोठ्या राजकीय पक्षांना राज्यातील लोकांच्या आरोग्यापेक्षाही मंदिरे- मशिदीची बंद दारे उघडण्याचीच जास्त चिंता असल्याचे दिसून येत आहे. धार्मिक स्थळे उघडल्यामुळे कोरोनाचा संसर्ग फैलावणार नाही, असा युक्तिवाद करत कोरोना महामारीच्या काळातही राजकीय नेते लोकांचे आरोग्य पणाला लावून मतांच्या राजकारणाची बेगमी करण्यातच स्वतःला धन्य मानत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.

 वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरांसह राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात आंदोलन करण्याची घोषणा केल्यानंतर या आंदोलनामुळे मंदिरे उघडलीच तर त्याचे श्रेय प्रकाश आंबेडकरांना जाईल, या भितीपोटी या आंदोलनाच्या एक दिवस आधीच भाजपने राज्यभर घंटानाद आंदोलन केले. हे आंदोलन करत असताना भाजप कार्यकर्ते ज्यांना आपले ‘आयडॉल’ म्हणजेच आदर्श पुरूष मानतात, त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून करण्यात येणाऱ्या ‘ दो गज की दुरी’च्या आवाहनालाही छेद देण्यात आला.

प्रकाश आंबेडकरांनी तर गर्दी केल्यामुळे कोरोना पसरत नाही, असे तर्कट मांडतच पंढपुरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आंदोलन केले. त्यांच्यासह पंधरा जणांना सरकारने विठ्ठलाचे मुख दर्शन घेण्याचीही परवानगी दिली आणि  नियमावली तयार करून लवकरच राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याचे आश्वासनही दिले. हे आश्वासन पाहता मंदिर- मशिदीत जाणारी सर्वच मते जणू प्रकाश आंबेडकरांच्याच पारड्यात जाणार की काय या भिती पोटी मग अन्य राजकीय नेत्यांनाही चेव आला. औरंगाबादेत एमआयएमनेही मंदिरे-मशीद उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली. त्यावरून खडकेश्वर मंदिर परिसरात शिवसेना आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जी गर्दी केली, त्यात कुठेही शारीरिक अंतर पाळले गेले नाही. विशेष म्हणजे औरंगाबाद हा कोरोनाचा हॉटस्पॉट असून दिवसाकाठी किमान तीनशे ते साडेतीनशे कोरोना बाधित रूग्ण आढळत आहेत. तरीही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून गर्दीचे बेजबाबदार राजकारण करण्यात आले.

आता या आंदोलनात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. ‘ अनलॉक क्रमांक अमुक तमुक अशा अनलॉक प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत.मॉल्स उघडले जात आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असे का? या सरकारला मंदिरे उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?,’ असा सवाल करत सरकारने लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलली नाहीत तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिरात प्रवेश करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

हा इशारा वाचा- निर्बंध उठवणे विध्वंसाला निमंत्रणः राज्यातीलच नव्हे तर जगातील कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने कोरोनाची महामारी संपली आहे, अशा पद्धतीने वागू नये. कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणे विध्वंसाला निमंत्रण देण्यासारखे आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम ग्रेब्रेयेसस यांनी दिला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आणायची असेल तर कोणत्याही देशाला आधी कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळवायला हवे आणि लोकांचे प्राणही वाचवायला हवेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

लोकांचे प्राण महत्वाचे की मतांची बेगमी?: जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा पाहता महाराष्ट्रातील राजकीय नेते ज्या पद्धतीने मंदिरांसह अन्य धार्मिक स्थळे उघडून मतांची बेगमी करण्यासाठी उतावीळ झाले आहेत, त्यांना लोकांचे आरोग्य आणि प्राण महत्वाचे वाटतात की नाही?, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला आहे. मंदिर- मशिदीच्या बाहेर छोटीशी अर्थव्यवस्था असते, ती रूळावर आणली गेली पाहिजे, याबद्दल कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही, परंतु जीव वाचले तरच ही अर्थव्यवस्था रूळावर येईल, याचा विसर महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांना पडल्याचे चित्र सध्या तरी दिसू लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा