वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर, राजीनामा देणार की अभय मिळणार?

0
78
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वादाच्या केंद्रस्थानी असलेले वनमंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी सपत्नीक वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. या वेगवान घडामोडींकडे राज्याचे लक्ष लागले असून मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राठोड राजीनामा देणार की त्यांना अभय मिळणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे.

उद्या, सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेच्या आधीच वनमंत्री संजय राठोड हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झालेले आहेत. अधिवेशनाच्या आधी राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने राज्यातील कोरोना संकट हाताळले, त्यामुळे जनमानसात त्यांची प्रतिमा उंचावली आहे. काही सर्वेक्षणामध्ये ते देशातील पहिल्या पाच सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. मात्र संजय राठोड प्रकरणावरून भाजपने जो पवित्रा घेतला आहे, त्यामुळे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना महाविकास आघाडीच्या घटक पक्षात झालेली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनीच संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचेही बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

पोहरादेवीच्या महंताचा दबावः एकीकडे विरोधक संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव वाढवत असतानाच दुसरीकडे पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारू नये, अशी विनंती केली आहे. या प्रकरणात संजय राठोड दोषी आढळले तर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा, असे आम्ही त्यांना सांगू, असेही महंत जितेंद्र महाराज यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा