ओबीसी नेत्याचा काटा ओबीसी नेत्याच्याच हातानेः संजय राठोड प्रकरणात भाजपची नवी खेळी!

0
3137
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पूजा चव्हाण प्रकरणाशी नाव जोडल्या गेल्यामुळे अडचणीत आलेले विदर्भातील दिग्रसचे शिवसेना आमदार आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या शक्यतांचा नुसताच बाजार गरम झालेला असतानाच या प्रकरणात भाजपने ओबीसीच्या विरोधात ओबीसी उभा करून नवी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. धनंजय मुंडे प्रकरणात भाजप ओबीसीविरोधी असल्याची प्रतिमा उभी राहिल्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजातील नेते संजय राठोड यांच्या विरोधात ओबीसी समाजाच्याच नेत्या चित्रा वाघ यांना आक्रमकपणे मैदानात उतरवल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजपमधील ‘सवर्ण’ नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. नंतर त्या महिलेने मुंडे यांच्या विरोधातील आरोप मागे घेतले आणि भाजप नुसती तोंडघशीच पडली नाही तर भाजपला ओबीसी नेते खुपतात म्हणूनच ते ओबीसी नेत्यांच्या विरोधात उभे ठाकतात, असा सूर तेव्हा उमटला आणि भाजपची ओबीसी विरोधी प्रतिमा उभी राहिली होती.

आता वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी जोडले गेल्यामुळे या प्रकरणात भाजपने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र यावेळी भाजपने संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांना आक्रमकपणे मैदानात उतरवले आहे. संजय राठोड हे विदर्भातील बंजारा समाजाचे नेते आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ या सुवर्णकार समाजातील नेत्या आहेत. म्हणजेच दोन्ही नेते ओबीसी समाजाचे आहेत. सत्ताधारी ओबीसी नेत्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षातील ओबीसी नेता आक्रमकपणे मैदानात आहे. संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांना मैदानात उतरवण्यामागे आपली ओबीसी विरोधी प्रतिमा पुन्हा अधोरेखित होऊ नये म्हणूनच ओबीसी नेत्याचा काटा ओबीसी नेत्याच्याच हाताने काढण्याची ही भाजपची खेळी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.

चित्रा वाघ या ओबीसी नेत्याला संजय राठोड यांना मैदानात उतरवल्यानंतर आता भाजप पुढची खेळी म्हणून भाजप ओबीसी मोर्चालाही संजय राठोड यांच्या विरोधात मैदानात उतरवणार आहे. ३ मार्च रोजी भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने राज्यभर आसूड आंदोलन केले जाणार आहे. आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजपने ओबीसीविरुद्ध ओबीसी अशी नवी थिअरी स्वीकारल्याचे राजकीय जाणकार सांगू लागले आहेत.

माजी आयपीएस अधिकाऱ्याने सुनावले खडे बोलः दरम्यान, भाजपच्या नेमक्या याच मानसिकतेवर माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये प्रकाश टाकला आहे  आणि चित्रा वाघ यांना खडे बोलही सुनावले आहेत. ‘दास, शूद्र व स्त्रीचे ताडण केले पाहिजे, अशी विचारधारा असलेल्या प्राचीन संस्कृतीचे पुनर्जीवन करण्यासाठी निर्माण झालेल्या पक्षात चित्राताई सामील झाल्यात. तिथल्या स्त्रियांबद्दल चित्राताई किती वेळा पोलिस स्टेशनमध्ये गेल्या? पूजा नावाच्या सज्ञान महिलेचे खाजगी आयुष्य तुम्ही वेशीवर टांगत आहात. पक्ष बदलून तुम्ही केलेले बंड हे केवढे मोठे वैचारिक अध:पतन आहे हेही लक्षात घ्या! वाघ कधीच पिसाळत नाही. वाघीण पिसाळते. जेव्हा तिच्या पिल्लावर हल्ला होतो तेव्हा… प्रश्न असा आहे की चित्रा वाघ यांच्या पोटच्या मुलीने पूजासारखे वर्तन केले असते तर चित्रा वाघ अशा वागल्या असत्या का? मुळीच नाही! चित्रा वाघ अशा का वागतात? चित्राताई, देवेंद्र नावाच्या भावाला व वहिनींना खूश करण्यासाठी तुम्ही मेहनत घेत असाल तर हे जोडपं हिंदुत्वाच्या नावाखाली मनुस्मृतीवर आधारित संस्कृती आणण्याचा विचार मांडतात. पण तुमच्या वहिनीच्या कृतीतील संस्कृतीत ते दिसत नाही. त्यावरही बोला! अशी एकांगी भूमिका घेऊन वाघीण बनता येणार नाही…’ असे खोपडे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा