अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

0
439
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पूजा चव्हाण प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री किंवा सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. वनमंत्री राठोड यांनी राजीनाम्यासाठी पूजा चव्हाण प्रकरणाचे कारण दिले की पोहरादेवी येथील शक्ती प्रदर्शनात गर्दी जमवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याचे कारण दिले, हेही स्पष्ट झालेले नाही.

उद्या सोमवारपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढवला होता. त्यामुळे आज संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर सपत्नीक पोहोचले. या भेटीतच ते राजीनामा देतील, असा अंदाज होता.

वनमंत्री संजय राठोड हे चर्चगेटमधील छेडा सदन या त्यांच्या निवासस्थानातून पत्नी शीतल राठोड आणि मेव्हणे सचिन नाईक यांच्यासह दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वर्षा बंगल्यावर पोहोचले. तेथे राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारला किंवा नाही, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.

संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला असला तरी तो मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांकडे पाठवावा लागेल, त्यानंतरच राठोड यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषदही घेणार आहेत. या बैठकीत आणि पत्रकार परिषदेत ते संजय राठोड यांच्या राजीनाम्याची माहिती देतील, अशी अपेक्षा आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकारला घेरण्याच्या विरोधकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाणार आहे.

 तत्पूर्वी संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा शक्ती कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे राजीनामे देऊन बाहेर पडू, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. सामान्यांना वेगळा न्याय आणि सत्ताधाऱ्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मोकळीक आपण दिली आहे काय? याचे उत्तर आम्हाला हवे आहे. मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाही तर आम्ही शक्ती कायद्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीतून राजीनामे देऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा