पूजा चव्हाणचे वडिल म्हणालेः आमची बदनामी थांबवा; नाही तर मीच आत्महत्या करेन!

0
849
संग्रहित छायाचित्र.

परळी वैजनाथ/पुणेः परळी येथील बंजारा समाजातील युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले असून महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याचे नाव जोडून भाजपकडून सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले जात असतानाच पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. आमची मुलगी असे कोणतेही कृत्य करणार नाही. आमचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. माझा कुणावरही संशय नाही. तिच्या आत्महत्येचे राजकारण थांबवा आमची बदनामी करू नका, अन्यथा मीच आत्महत्या करेन, असे लहू चव्हाण म्हणाले.

 पूजा चव्हाणच्या आत्महत्येवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना पूजाच्या कुटुंबीयांकडून पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. पूजा आमची मुलगी नव्हती तर मुलगा होता. ती अत्यंत धाडसी होती. पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी पूजाच्या नावावर २०-३० लाखांचे कर्ज काढले होते. बांधकाम केले आणि पोल्ट्री फार्म सुरू करतानाच कोरोना आला. त्यामुळे आम्ही कोंबड्या फुकटात वाटल्या. त्याचा ताण पूजाला होता. पूजा सतत आजारी असायची. याचाही ताण तिला येत होता. मी तिला तू ताण घेऊ नको सर्वकाही व्यवस्थित होईल, असे सांगितले होते. परंतु तिने याच कारणामुळे पुण्याला जाऊन बहुतेक आत्महत्या केली आहे, असे वाटते. दुसरे कोणतेही कारण नाही, असे लहू चव्हाण म्हणाले.

हेही वाचाः पूजा चव्हाण प्रकरणी पोलिस महासंचालकांचे चौकशीचे आदेश, वनमंत्री राठोड नॉट रिचेबल

 पूजाच्या आत्महत्येबाबत चौकशीतून काय पुढे यायचे ते येईलच, परंतु आमची बदनामी सुरू असून ती थांबवावी. यावरून राजकारण करू नका अन्यथा मीच आत्महत्या करेन, असे लहू चव्हाण म्हणाले.

 आत्महत्या नव्हे, पूजा चक्कर येऊन पडली?:  दरम्यान, पुण्यात पूजा चव्हाण सोबत राहणारे अरूण राठोड आणि विलास चव्हाण या दोघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून त्यांच्या जबाबानुसार पूजा चव्हाण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूजा चव्हाणने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन बाल्कनीतून पडली, असे या दोघांनी पोलिसांत नोंदवलेल्या जबाबत म्हटले असल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पूजा चव्हाणच्या आईवडिलांचा जबाब पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा