शिष्यवृत्तीची रक्कम ६ दिवसांत होणार बँक खात्यात जमा, राज्यातील दोन लाख विद्यार्थ्यांना दिलासा!

2
541
संग्रहिित छायाचित्र.

मुंबईः  अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपसाठी ४६२ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी राज्याच्या वित्त विभागाने समाज कल्याण आयुक्तालयाकडे वर्ग केला असून राज्यातील १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांची  शिष्यवृत्ती व फ्रीशिप शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांना ६ दिवसांच्या आत त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती आपल्या खात्यावर मिळेल, असे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीसाठी मुंबईत आल्यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या शिष्यवृत्ती संदर्भात मागणी केली असता पवार यांनी त्यास तात्काळ मान्यता देत  वित्त विभागामार्फत शिष्यवृत्तीचा ४६२.६९ कोटी रुपये निधी समाज कल्याण आयुक्तालयास वर्ग केला आहे.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी १ लाख ६९ हजार १७१ विद्यार्थ्यांची एकूण ३४७ कोटी ६९ लाख रुपये शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या २७ हजार ८४५ विद्यार्थ्यांची ११४ कोटी रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वित्त विभागाने तातडीने आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या खात्यावर वर्ग केली असून सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना येत्या ६ दिवसांच्या आत प्रत्यक्ष वाटप केली जाईल अशी मुंडे यांनी दिली.

लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, तसेच या रकमेच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा या उद्देशाने मुंडे यांनी पवार यांच्याकडे पाठपुरावा करून यासाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तातडीने ही शिष्यवृत्ती देऊ केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

एकही विद्यार्थी वंचित राहणार नाहीः सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपची रक्कम विभागाला प्राप्त झाली असून, येत्या ६ दिवसात ही रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात येईल. एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

2 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा