कोरोनाची धास्तीः औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक पुढे ढकला, खा. जलील यांची मागणी

0
77
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः कोरोना व्हायरसचा धसका खासदार इम्तियाज जलील यांनीही घेतला आहे. केंद्र सरकारने या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी गर्दीचे सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे काही येत्या महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जातील. या सभांमधून कोरानाचा फैलाव होण्याचा धोका संभवतो, असे सांगत राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकलून महापालिकेवर प्रशासक नेमावा, अशी मागणी खा. जलील यांनी पत्रकार परिषदेत केली.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे इच्छुक आणि राजकीय पक्ष तयारीला लागले असतानाच खासदार जलील यांनी मात्र ही निवडणूकच पुढे ढकलण्याची मागणी केल्यामुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने महिला दिनानिमित्त आयोजित मुशायरा रद्द केला. मात्र यानंतर पोलीस विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम व शहरात एक खाजगी कार्यक्रमही झाला. त्यासाठी परवानगी देण्यात आली पण मुशायराला परवानगी नाकारण्यात आली. कोरोना व्हायरसमुळे मार्च महिन्यात जिल्ह्यात होणारा तबलीगी इज्तेमा आयोजकांशी चर्चा करुन पुढे ढकेलण्यात येईल, असे जलील म्हणाले. औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याच्या निर्णय़ाचे त्यांनी स्वागत केले. मात्र शहराला त्यांचे नाव देऊन त्यांना छोटे करु नका, असा टोला जलील यांनी लगावला.

ठाकरे, मुंडे स्मारकाविरोधात कोर्टात जाणारः शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी महापालिका व सिडको निविदा काढणार आहे.  त्याविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचे  खा. जलील म्हणाले. या दोन्ही स्मारकांसाठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यास आमचा विरोध आहे. आम्ही या स्मारकांच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत. शहरात शैक्षणिक, आरोग्य सेवा नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे. असे असताना जनतेच्या पैशांचा स्मारक बनवण्यासाठी दुरुपयोग केला जात आहे. कोट्यवधी रुपयांचे स्मारक बनवण्यासाठी उधळपट्टी करण्यापेक्षा सरकारने या पैशातून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबांतील मुलांना शैक्षणिक सुविधा व सामान्य जनतेला आरोग्य सेवा देण्याची योजना राबवावी, असे जलील म्हणाले. स्मारक बनवायचेच असेल शिवसेना, भाजपने स्वतःच्या पैशातून उभारावे. जनतेच्या पैशाची या कामासाठी उधळपट्टी करू नये, असाही टोला त्यांनी लगावला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा