कोरोनामुळे औरंगाबाद मनपाची निवडणूक पुढे ढकला, ६ महिने मुदतवाढ द्याः महापौरांची मागणी

0
133
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः जगभरात कोरोना विषाणुच्या फैलावामुळे दहशत निर्माण झाली आहे आणि आता महाराष्ट्रातही कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये होऊ घातलेली औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक पुढे ढकलावी आणि महापालिकेला सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी असून देश-विदेशातून येथे पर्यटक येतात. त्यामुळे शहरात कोरोनाची लागण होईल याची शक्यता नाकारता येत नाही, असे महापौर म्हणाले.

जगभरातील शंभरहून अधिक देशात कोरोनाचा फैलाव झाला आहे.  भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या ६१ वर गेली आहे. औरंगाबाद हे पर्यटनाच्या राजधानीचे शहर आहे. यामुळे या ठिकाणी जगभरातील पर्यटक येतात. त्यामुळे कोरोना विषाणुची लागण कधी होईल याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना विषाणुचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. महापालिका प्रशासन कोणतीही जोखीम घेणार नाही. कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे परिपत्रक महापालिकेला प्राप्‍त झाले आहे. या परिपत्रकानुसार शक्यतो सार्वजनिक उत्सवात गर्दी टाळावी, हे उत्सव गर्दीमध्ये घेतले जावू नये, अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, असे घोडेले म्हणाले.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया सुरु केली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होवू शकते. मात्र कोरोना विषाणुमुळे शहरात भितीचे वातावरण आहे. अशा वातावरणात निर्भयपणे व मुक्त वातावरणात निवडणूक होणे शक्य नाही. म्हणून सहा महिने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

प्रशासक नको, नगरसेवकांना मुदतवाढ द्याः शहरातील नगरसेवकांचा व महापालिका पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ 29 एप्रिल रोजी संपत आहे. आचारसंहिता लागताच कोणतेही अधिकार राहत नाही. सहा महिन्यांची मुदतवाढ देताना प्रशासकाची नियुक्ती करण्याऐवजी विद्यमान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना काळजीवाहू म्हणून काम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. कोरोनासारखा गंभीर आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन आणि जनता यांच्यामधील प्रमुख दुवा म्हणून लोकप्रतिनिधी आहेत. प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींना काम करता येईल, असे महापौरांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा