गाफील राहू नका, युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेच्या मुकाबल्याची तयारी कराः मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0
447
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील राहू नका! युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे आपण कोरोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्यासाठी नियोजन करा, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या. मात्र, दुसऱ्या लाटेची तयारी करताना मास्क, हात धुवा, सुरक्षित अंतर हे नियम पाळले गेलेच पाहिजेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत संवाद साधला आणि कोरोना संदर्भात उपाययोजनांची माहिती करून घेतली. आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

 दिवाळीनंतर पुढचे १५ दिवस जागरुकतेचे आहे, त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पहा, असेही ते म्हणाले. हे ’वर्ल्ड वॉर’ आहे असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो, इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू  मिळविण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे. त्यामुळे सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागात सुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्य विषयक खबरदारी पाळली, मात्र आत्ता थंडी आली आहे. या काळात कोविड व्यतिरिक्त इतर आजारही उफाळून येतात. विशेषत: ह्रदयविकार, न्युमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. फ्ल्यू आणि कोरोनातील फरकही कळला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा तयारः महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा या मोहिमेच्या निमित्ताने तयार झाला आहे. मोहिमेत सापडलेल्या सहव्याधी नागरिकांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. त्यांची सातत्याने  चौकशी करा; त्यामुळे दुसरी लाट आली तरी मोठी आपत्ती टाळू शकू, असा विश्वास व्यक्त करतानाच सध्या फिल्ड हॉस्पिटल किंवा कोविड केअर केंद्राच्या उभारण्यात आलेल्या सुविधा काढून टाकू नका. आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे. त्यामुळे काही उणीवा असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न करा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सुपर स्प्रेडर्सच्या होणार चाचण्या: सर्व काही खुले केल्याने विशेषत: शासकीय कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. ती कमी करणे, त्यासाठी काही कल्पक उपक्रम राबविणे गरजेचे आहे. जनतेच्या खूप जास्त संपर्कात येणारे लोक, बस चालक-वाहक, सार्वजनिक व्यवस्थेतील कर्मचारी हे सुपर स्प्रेडर्स असू शकतील. त्यामुळे त्यांच्या चाचण्या लगेच करून घेण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा