अहमदाबादेत ७० लाख लोक तुमच्या स्वागताला येतीलः नरेंद्र मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांना आश्वासन

0
173
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या २४ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार असून अहमदाबादेत ७० लाख लोक तुमच्या स्वागताला येतील, आमच्याकडे कोट्यवधी लोक आहेत, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास दिले असल्याचे खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच सांगितले आहे. विशेष म्हणजे २०११ च्या जनगणनेनुसार अहमदाबादची लोकसंख्या ५५.६ लाख आहे आणि ज्या मोटेरा स्टेडियमवर ट्रम्प यांचा कार्यक्रम होणार आहे, त्याची आसनक्षमता १ लाख १० हजार आहे. त्यामुळे मोदी यांना ट्रम्प यांना ७० लाख लोक स्वागताला येतील, असे आश्वासन का आणि कसे दिले असा सवाल विचारण्यात येत आहे.

वॉशिंग्टनमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी खूपच आवडतात. अहमदाबादचे विमानतळ ते मोटेरा स्टेडियमपर्यंत तुमच्या स्वागतासाठी ७० लाख लोक येतील, असे आश्वासन मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ज्या मोटेरा स्टेडियम कार्यक्रम होणार आहे, ते जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. असेही मोदी यांनी मला सांगितले. ते खूपच रोमांचकारी आहे, ट्रम्प म्हणाले.

आता मोदी यांनी ट्रम्प यांना दिलेल्या आश्वासनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार अहमदाबादची लोकसंख्या ५५.६ लाख आहे. गेल्या नऊ वर्षांत तिच्या वाढ होऊन ती ७० लाखांपर्यंत पोहोचली असेल असे गृहित धरले तरी अख्खे अहमदाबाद शहर झाडूनपुसून ट्रम्प यांच्या स्वागताला रस्त्यावर उतरावेच लागेल, अशी खोचक टिप्पणी बीबीसी इंडियाचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर यांनी ट्विट करून केली आहे. जे मोटेरा स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असल्याचे मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितले आहे, त्याची बांधकाम पूर्ण झाल्यानंतरची आसन क्षमता १ लाख १० हजार प्रेक्षकांची आहे. २०१७ मध्ये या स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले.

मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यात झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेत ट्रम्प यांचा के छो ट्रम्प हा कार्यक्रम होणार असून ट्रम्प रोडशोही करणार आहेत. या रोडशोमध्येच ७० लाख लोक येतील असे आश्वासन मोदी यांनी ट्रम्प यांना दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा