प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक, सरकारी यंत्रणांची उडाली झोप

0
126
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर हँडल  काही वेळासाठी हॅक करण्यात आल्यानंतर शनिवारी मध्यरात्री खळबळ उडाली होती. क्रिप्टो करन्सीला कायदेशीर मान्यता द्यावी, या मागणीसाठी हॅकर्सने ही आगळीक केल्याने आज भल्या पहाटेच सरकारी यंत्रणांची झोप उडाली होती. ट्विटरला याची माहिती दिल्यानंतर काही वेळांनी हे ट्विटर अकाऊंट पूर्ववत आणि सुरक्षित करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर हँडल हॅक करण्यात आल्यानंतर क्रिप्टो करन्सीला चालना चालना देणारे ट्विट करण्यात आले होते. हे हँडल पूर्ववत करण्यात आल्यानंतर ते ट्विट डिलिट करण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलबाबत प्रधानमंत्री कार्यालय म्हणजेच पीएमओने एक ट्विट केले आहे. ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल काही वेळासाठी हॅक करण्यात आले होते. ही बाब ट्विटरच्या लक्षात आणून देण्यात आली आणि हे खाते तत्काळ सुरक्षित करण्यात आले. काही वेळासाठी या अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली. तेव्हाच्या कोणत्याही ट्विटकडे दुर्लक्ष करा,’ असे पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे @narendramodi  हे वैयक्तिक ट्विटर हँडल पूर्ववत करण्यापूर्वी मोदींच्या टाइमलाइनवर एक यूआरएलसह एक ट्विट करण्यात आले होते. त्यात ‘ भारताने अधिकृतपणे बिटकॉइनला कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने अधिकृतरित्या ५०० बीटीसी खरेदी केले आहेत आणि ते देशातील सर्व नागरिकांना वितरित करत आहेत,’ असे म्हटले होते. हॅकरने केलेले हे ट्विट हटवण्यात आले आहे. पीएमओने अशाच ट्विटकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे.

 नंतर प्रधानमंत्र्यांच्या प्रोफाइलवरून हटवण्यात आलेले हे ट्विट राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांसह अनेक ट्विटर यूजर्सनी शेअर केले. राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी प्रधानमंत्री मोदींचे ट्विटर हँडल हॅक केल्याच्या पार्श्वभूमीवर ट्विट केले आणि म्हटले की, माननीय पीएम नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते का? आणि बिटकॉइनचा वादा!, असे पूनावाला यांनी म्हटले.

मागील महिनाभरापासून केंद्र सरकार देशात क्रिप्टो करन्सीच्या धोरणाबाबत चर्चा करत आहे. देशात बिटकॉइन आणि अन्य क्रिप्टो करन्सी चलनाच्या कायदेशीर मान्यतेबाबत आजही संदिग्धता कायम आहे. अशातच शनिवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर हँडल हॅक करून बिटकॉइनच्या मान्यतेबाबत ट्विट करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.

 सप्टेंबर २०२० मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक वेबसाईट आणि मोबाइल ऍपशी संबंधित ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. ट्विटरनेही याला दुजोरा दिला होता. हॅकर्सनी हॅकिंगनंतर एकानंतर एक अनेक ट्विट केले होते. या ट्विट्समध्ये मोदींच्या फॉलोअर्सना प्रधानमंत्री फंडासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये निधी देण्याचा आग्रह करण्यात आला होता.

तेव्हा हॅकर्सनी एका ट्विटमध्ये लिहिले होते, ‘ मी तुम्हा लोकांना आवाहन करतो की, कोविड-१९ साठी तयार करण्यात आलेल्या पीएम मोदी रिलिफ फंडासाठी दोन करा.’ अन्य एका ट्विटमध्ये लिहिले होते की, हे अकाऊंट जॉन विकने हॅक केले आहे. आम्ही पेटीएम मॉल हॅक केलेला नाही’. नंतर हे ट्विट हटवण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा