प्रा. नागनाथ तोटावाड प्रकरणी सगळेच गोलमाल: एकच व्यक्ती दोन संवर्गाचे लाभ कशी लाटते?

0
552
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः एकच व्यक्ती दोन आरक्षित प्रवर्गाचे लाभ लाटून गेल्या १६ वर्षांपासून शासन अनुदानित महाविद्यालयात वेतन लाटत आहे. औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे सहायक प्राध्यापक डॉ. नागनाथ तोटावाड यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. त्यांनी एसटी संवर्गातून सेट परीक्षा उत्तीर्ण केली आणि ओबीसी संवर्गातून प्राध्यापकाची नोकरी मिळवली. ही बाब सर्वच प्राधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊनही फक्त कागदी घोडे नाचवून त्यांना संरक्षण देण्याचेच प्रयत्न केले जाताना दिसत आहेत. आता या प्रकरणी जात पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि विवेकानंद महाविद्यालयाला नोटिसा बजावून जाब विचारणार आहे. न्यूजटाऊन या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत असून या प्रकरणात धक्कादायक खुलासेही होत आहेत.

औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. डॉ. नागनाथ रामराव तोटावाड हे २९ सप्टेंबर २००३ रोजी एसटी प्रवर्गातून इंग्रजी विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांचा सेट परीक्षेचा आसन क्रमांक ०२८०४ असून पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेच्या वेबसाईटवर हा डेटा उपलब्ध आहे.

हेही वाचाः फसवाफसवीः सेट परीक्षा उत्तीर्ण एसटी प्रवर्गातून, प्राध्यापकाची नोकरी मिळवली ओबीसी प्रवर्गातून

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्याचे सर्वच रिपोर्ट वाचा एका क्लिकवर

२००५ मध्ये औरंगाबादच्या विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात निघालेल्या नोकर भरतीच्या जाहिरातीसाठी नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्यातापदासाठी (सध्याचे सहायक प्राध्यापकपद) अर्ज केला. त्यांची दिनांक २९ ऑगस्ट २००५ रोजी पूर्णवेळ अधिव्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या नियुक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिनांक ३ ऑक्टोबर २००५ रोजी मान्यताही दिली. त्यानंतर प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना ६ ऑगस्ट २०१२ रोजी सीएएस अंतर्गत सहायक प्राध्यापक पदासाठी मंजुरीही देण्यात आली.

हेही वाचाः पुणे विद्यापीठानेही उघड केली प्रा. तोटावाड यांची बनवाबनवी, एसटीचे जातप्रमाणपत्र आणले समोर

प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी २५ ऑगस्ट २००४ कुलेकडगी (ओबीसी) जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि २५ जुलै २००७ रोजी पडताळणी प्रमाणपत्रही मिळवले.

विशेष बाब म्हणजे प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होऊन पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नांदेडच्या उपजिल्हाधिकारी आणि विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयातून २५ ऑगस्ट २००४ रोजी इतर मागास प्रवर्गात असलेल्या कुलेकडगी जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले. विवेकानंद कला आणि सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील नोकरीसाठी प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी ओबीसी प्रवर्गातील राखीव जागेसाठी नियुक्ती मिळवल्यामुळे महाविद्यालयाने त्यांच्या जातप्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव २० फेब्रुवारी २००६ रोजी औरंगाबाद विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पाठवला. जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने २५ जुलै २००६ रोजी प्रा. नागनाथ तोटावाड यांचा कुलेकडगी (इतर मागास वर्ग) जातीचा दावा वैध ठरवला आणि आणि त्यांना जातप्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र बहाल केले.

हेही वाचाः फसवाफसवीचे कोण कोण भागीदार?: प्रा. तोटावाड यांना उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाचे अभय?

ओबीसी संवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून त्याची पडताळणीही करून घेण्याआधी तोटावाड यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकरच्या तहसीलदारांकडून ५ मार्च १९९२ रोजी कोया जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड हे नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील हडोळी येथील रहिवासी आहेत. कोया ही जात अनुसूचित जमाती प्रवर्गात येते. प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी १९९२ पासून ते २००४ मध्ये कुलेकडगी हे ओबीसी संवर्गातील जात प्रमाणपत्र मिळवेपर्यंत एसटी संवर्गाचेच लाभ घेतले आहेत. एसटी संवर्गाचाच लाभ घेत त्यांनी सप्टेंबर २००३ मध्ये सेट परीक्षाही उत्तीर्ण केली आहे.

प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांनी ५ मार्च १९९२ रोजी भोकरच्या तहसीलदारांकडून मिळवलेले कोया (एसटी) जातीचे प्रमाणपत्र.

प्रा. नागनाथ तोटावाड यांच्या ओबीसी संवर्गातील अधिव्याख्यातापदाला मान्यता देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि त्या पदाचे शासकीय अनुदानातून वेतन देणाऱ्या औरंगाबादच्या विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांकडे या फसवाफसवी संदर्भात पुराव्यानिशी तक्रार रिपाइंचे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांनी तक्रार दिल्यानंतर विद्यापीठ, उच्च शिक्षण सहसंचालक आणि पुणे विद्यापीठ यांनीही कागदी घोडे नाचवण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचाः न्यूजटाऊन इफेक्टः प्रा. नागनाथ तोटावाड यांचे सेट प्रमाणपत्र रद्द कराः ‘बामु’चे पुणे विद्यापीठाला पत्र

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विवेकानंद महाविद्यालयास पत्र लिहून तीन दिवसांत अहवाल मागवला. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाला पत्र लिहून कारवाई करण्याची सूचना केली. कहर म्हणजे नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुणे विद्यापीठाला पत्र लिहून प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांचे सेट प्रमाणपत्र रद्द करावे, अशी सूचना करणारे पत्र लिहिले. अशा प्रकारे सगळेच प्राधिकारी कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा करत आहेत. त्यातून प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. प्रा. नागनाथ तोटावाड यांनी केलेल्या फसवाफसवीचे स्वयंस्पष्ट पुरावे असूनही हा वेळकाढूपणा कशासाठी केला जात आहे? असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

एकच व्यक्ती दोन संवर्गाच्या आरक्षणाचे लाभ कसे काय घेऊ शकते? अशी तक्रार आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे धाव घेतली आहे. या तक्रारीनुसार १८ जानेवारी रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रा. डॉ. नागनाथ तोटावाड यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. परंतु ते हजर झालेच नाही. तक्रारदार नागराज गायकवाड यांनी मात्र समितीसमोर आपले म्हणणे मांडले आहे. आता जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि विवेकानंद महाविद्यालास नोटीस बजावून एकाच व्यक्तीला दोन आरक्षित संवर्गाचे लाभ कसे काय दिले? याचा जाब विचारणार आहे.

न्यूजटाऊनच्या बातम्यांंबद्दल आपल्या प्रतिक्रिया आवश्य कळवाः व्हॉट्सअप क्रमांक: 9823427325 किंवा ईमेलः m.newstown@gmail.com

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा