दहावीची परीक्षा २९ तर बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून, संभाव्य वेळापत्रक जाहीर

0
130
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. कोरोनाच्या संकटामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष विस्कळित झाले असून त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षाही उशिरा घेतल्या जात आहेत.

मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मेदरम्यान घेतली जाईल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मेदरम्यान घेतली जाईल. या परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षांचे वेळापत्रक शाळांना कळवण्यात येणार आहे.

या संभाव्य वेळापत्रकाबाबत विद्यार्थी- पालकांना काही आक्षेप किंवा सूचना असतील तर त्यांना त्या २२ फेब्रुवारीपर्यंत बोर्डाला लेखी स्वरुपात कळवता येतील. बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेल्या वेळापत्रकाशिवाय अन्य कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा